राज्यात उष्माघाताने घेतला पहिला बळी; विदर्भात शाळकरी मुलाचा मृत्यू 

राज्यात उष्माघाताचा तडाखा जीवघेणा ठरला आहे. 45 अंशांच्या पुढे झेपावलेल्या कमाल तापमानाने शुक्रवारी विदर्भात एका शाळकरी मुलाचा जीव घेतला. बुलढाणा जिह्यातील शेगाव येथील 12 वर्षांच्या शाळकरी मुलाला कडक उन्हाचा त्रास असह्य झाला. त्यात त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. उन्हाचा तडाखा वाढला असतानाही शाळा सुरू आहेत. याचदरम्यान शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासन हादरले आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. विक्रमी तापमानवाढ झाली असतानाही शाळा सुरू आहेत. या उष्माघातामध्ये अनेक मुले चक्कर येऊन खाली कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशाच मुलांपैकी 12 वर्षीय संस्कार सोनटक्के या मुलाला उन्हाचा प्रचंड त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. संस्कार हा संत गजानन महाराज ज्ञानपीठमध्ये सहावी इयत्तेत शिकत होता. त्याचा मृत्यू झाल्यानंतर बुलढाणा जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.