हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांनी लष्कर ए तोयबाच्या टॉपच्या पाकिस्तानी कमांडरचा खात्मा केल्यानंतर आज दहशतवाद्यांनी टुरिस्ट रिसेप्शन सेंटरजवळच्या पर्यटक आणि ग्राहकांच्या वर्दळीने गजबजलेल्या संडे मार्केटमध्ये ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात 12 जण गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर मार्केटमध्ये एकच गोंधळ, किंकाळ्या आणि वेदनेने विव्हळणारे जखमी नागरिक असे चित्र होते. दरम्यान, हल्लेखोर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी या संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
संडे मार्केटजवळ असलेल्या सीआरपीएफच्या बंकरवर दहशतवादी ग्रेनेड हल्ला करणार होते, परंतु मार्केटमध्ये हल्ला करण्यात आला आणि यात 12 नागरिक गंभीर जखमी झाल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. श्रीनगरमध्ये गेल्या दोन वर्षांतील अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला होण्याची ही दुसरी घटना आहे. 2 नोव्हेंबर रोजी खानयार भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. एका घरात दोन ते तीन दहशतवादी लपले होते. लष्कराच्या जवानांनी घरावर बॉम्बफेक केली. यात पाकिस्तानी दहशतवादी टॉपचा कमांडर मारला गेला. घटनास्थळावरून दहशतवाद्याचा मृतदेह आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या चकमकीत चार जवानही जखमी झाल्याचे वृत्त आहे.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता
गेल्या काही दिवसांपासून कश्मीर खोऱ्यातील काही भागात दहशतवादी हल्ले आणि चकमकी झाल्याच्या बातम्या येत आहेत. आज श्रीनगरच्या संडे मार्केटमध्ये निरपराध दुकानदारांवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याची बातमी आली. निरपराध नागरिकांसाठी हे हल्ले अत्यंत त्रासदायक आहेत, अशा शब्दांत जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दहशतवादी हल्ल्यांबद्दल संताप आणि चिंता व्यक्त केली.
36 तासांत तीन चकमकी
जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या 36 तासांत तीन चकमकी उडाल्या. शनिवारी शांगस लार्नूच्या जंगलात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. अनंतागमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात जाहिद राशीद आणि अरबाद अहमद मीर हे दोन दहशतवादी मारले गेले. श्रीनगरमधील चकमकीत दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान आणि दोन पोलीस जखमी झाले.