पश्चिम रेल्वेवर आज रात्रीपासून 12 तासांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यानच्या पुलाचे काम करण्यासाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तसेच अप आणि डाऊन हार्बर मार्गावर 12 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 11.30 पासून ते रविवारी सकाळी 11.30 पर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.  ब्लॉक कालावधीत राम मंदिर येथे अप आणि डाऊन दिशांना कोणतीही लोकल उपलब्ध नसेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे या मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा आणि काही मेल/एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होणार आहे. सर्व अप आणि डाऊन धीमी मार्गिका अंधेरी आणि गोरेगाव/बोरिवली दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर चालवल्या जातील. मध्य रेल्वेवरून सुटणाऱ्या सर्व हार्बर मार्गावरील सेवा फक्त अंधेरीपर्यंत धावतील. तसेच काही चर्चगेट- गोरेगाव/बोरिवली धीम्या लोकल अंशतः रद्द होतील आणि अंधेरीहून पूर्ववत केल्या जातील. ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मेल एक्सप्रेस गाड्या 10 ते 20 मिनिटे विलंबाने धावतील.

मध्य, हार्बरवर उद्या ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 पासून दुपारी 3.55 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या कालावधीत माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर कळवण्यात येणार आहे. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. तर, विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर या स्थानकांवर लोकल सेवा उपलब्ध नसेल. हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गाकर सकाळी 11.10 पासून दुपारी 04.10 पर्यंत ब्लॉक असणार आहे. या कालावधीत सीएसएमटी ते वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे.