हाथरसमध्ये भोलेबाबांच्या भक्तांवर काळाचा घाला; सत्संगमध्ये चेंगराचेंगरीत 116 जणांचा मृत्यू; दीडशेहून अधिक जखमी

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे आज भोले बाबाच्या सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन तब्बल 116 जणांचा मृत्यू झाला, तर दीडशेहून अधिक जखमी झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये 108 महिला तर 7 मुलांचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली. हाथरसपासून 47 किलोमीटरवर असलेल्या फुरई गावात ही घटना घडली. सत्संग संपल्यानंतर सर्वांनी एकाच वेळी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु गेट लहान असल्याने चेंगराचेंगरी झाली. सगळीकडे किंकाळय़ा ऐकू येत होत्या. मृतदेहांचा खच पडल्याचे भयंकर चित्र होते. सत्संगासाठी तब्बल 20 हजारांहून अधिक लोकांनी गर्दी केली होती.

दुर्घटनेनंतर तत्काळ 27  मृतदेह टेम्पो, बसमधून सिपंद्राराऊ सरकारी रुग्णालयात आणण्यात आले. यात 23 महिला आणि तीन मुले आणि एका पुरुषाचा समावेश होता, अशी माहिती एटाचे पोलीस अधीक्षक राजेश कुमार सिंह यांनी दिली. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि अलीगढ पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक पथक नेमण्यात आले आहे.

शिपायाला हार्ट अॅटॅक

एटा येथील वैद्यकीय महाविद्यालय मोठय़ा संख्येने मृतदेह आणण्यात आले. हे मृतदेह पाहून डय़ुटीवर तैनात पोलीस शिपाई रजनेश (30) यांना हार्ट अॅटॅक आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांचे अनुदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला असून जखमींना योग्य उपचार मिळून ते लवकरात लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आपल्या सहवेदना मृतांच्या नातेवाईकांसोबत असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना, कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची सानुग्रह आर्थिक मदत आणि जखमींवरील उपचारासाठी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उत्तर प्रदेश सरकारने स्पष्ट केले आहे. 

मृतांच्या नातेवाईंकांसोबत माझ्या सहवेदना– राहुल गांधी

सरकारने, स्थानिक प्रशासनाने मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत द्यावी, असे आवाहन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे. ज्यांनी आपल्या नातेवाईकांना गमावले आहेत त्यांच्यासोबत माझ्या सहवेदना आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे.

कोण आहेत भोलेबाबा?

भोलेबाबा यांचे खरे नाव नारायण साकार हारी असे आहे. ते काही वर्षे उत्तर प्रदेश पोलीस खात्यात गुप्तचर विभागात नोकरी करत होते. त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ सत्संग कार्यक्रम सुरू केले.

सरकारने भाविकांच्या सुरक्षेसाठी काय केले? – अखिलेश यादव

सरकारने सत्संगमधील भाविकांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केली होती, असा सवाल समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे. कुठलाही भव्य कार्यक्रम सुरू होण्यापासून तो संपेपर्यंत जर योग्य  नियोजन केले नाही तर अशा घटना घडणारच. अशा घटनांना सरकारच जबाबदार असल्याचे ते म्हणाले.