पाच बिल्डरांनी ‘शिवशाही’चे 116 कोटी रुपये भाडे थकवले

प्रातिनिधिक

शहरातील पाच बड्या बिल्डरांनी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या संक्रमण शिबिराचे तब्बल 116 कोटी रुपयांचे भाडे थकवल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे.

झोपड्याचा पुनर्विकास करताना तेथील रहिवाशांची तात्पुरती निवाऱ्याची सोय म्हणून बिल्डर त्यांना संक्रमण शिबिरात घरे देतात. त्यासाठी बिल्डर शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाकडून संक्रमण शिबिरे भाडेतत्त्वावर घेतात. 40 हजार रुपये डिपॉझिट आणि 7 हजार रुपये भाडे एका घरासाठी शिवशाहीकडून आकारले जाते. शहरातील पाच बड्या बिल्डरांना शिवशाहीने 667 घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बिल्डरांनी थकीत भाडे न  भरल्यामुळे थकबाकीचा आकडा व्याजासहित 116 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बिल्डरांनी थकवलेल्या भाड्यासंदर्भात शिवसेना पक्षसंघटक विलास रुपवते यांनी माहितीच्या अधिकाराखाली शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाकडून माहिती मागवली असता ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

दरम्यान, शिवशाहीचे अधिकारी बिल्डरांना फक्त नोटीस पाठवतात, पण बिल्डर त्यांच्या नोटिसीला जुमानत नाही. सरकार अशा बिल्डरांवर कारवाई करणार का, असा सवाल विलास रुपवते यांनी उपस्थित केला आहे.