बांबू लागवडीसाठी सरकारी तिजोरीला 113 कोटींचा ‘बांबू’, प्रकल्प राबवणाऱ्या अधिकाऱ्यांना कोट्यवधींची बक्षिसे

<<< राजेश चुरी

राज्याच्या तिजोरीत एकीकडे खडखडाट होत असताना दुसरीकडे राज्यात बांबू लागवडीसाठी लाखो-कोटींची बक्षिसे लावण्यात आली आहेत. या स्पर्धेसाठी तब्बल 113 कोटी 96 रुपयांची बक्षिसे लावली आहेत. बांबू प्रकल्प राबवणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत, तर 100 सरकारी अधिकाऱ्यांवर फॉरेन टूरची खैरात केली जाणार आहे, मात्र प्रत्यक्षात बांबू लागवड करणाऱ्या ग्रामपंचायतींची लाख रुपयांमध्ये बोळवण करण्यात येणार आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत राबविण्यत येणाऱ्या लागवड मोहिमेला स्पर्धात्मक रूप दिले आहे. त्यासाठी 113 कोटी रुपयांची विविध बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांबू लागवड मिशन मोडवर राबवण्याची सूचना दिली आहे. बांबू लागवडीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स नेमलेला आहे.

या योजनेसाठी महसुली विभागात तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे 15 लाख रुपये, 10 लाख रुपये आणि 7 लाख रुपयांचे आणि राज्यस्तरावर 25 लाख रुपये, 15 लाख रुपये आणि 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तर राज्यस्तरावर तीन पंचायत समित्यांना 3 कोटी रुपये, 2 कोटी रुपये आणि 1 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. राज्यस्तरावर गटनिहाय प्रत्येक जिह्याला एक असे तीन गटांत प्रत्येकी पाच कोटी रु. तसेच तीन जिह्यांना अनुक्रमे 10 कोटी रु., 7 कोटी रु. आणि 5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

प्रकल्प राबवणाऱ्या राज्यस्तरावर तीन प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रत्येकी 3 कोटी रुपये, 2 कोटी रुपये आणि 1 कोटी रुपये, मंत्रालीयन विभागासाठी 10 कोटी रुपयांचे बक्षीस आहे. तसेच वैयक्तिक स्तरावरील मोजके 100 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या परदेशात अभ्यास दौऱ्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.