गडचिरोली जिह्यात विधानसभा निवडणुकीत मतदार मोठय़ा संख्येत उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले. लोकशाहीच्या या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत येथील 111 वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले. फुलमती बिनोद सरकार असे त्या आजींचे नाव असून त्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत. भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांवरील मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती. त्या कालावधीत गृह मतदान प्रक्रियासुद्धा राबविली, मात्र या आजीने प्रत्यक्ष मतदान केंद्रावरच जाऊन मतदान केले. प्रशासनाने या आजींचे शाल-श्रीफळ देऊन स्वागत केले. फुलमती बिनोद सरकार या आजीला प्रशासनाने चारचाकी वाहनातून मतदान केंद्रावर आणले. त्यांनतर शालेय विद्यार्थी, गावकरी तसेच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱयांनी पुष्पांचा वर्षाव करत मतदान पेंद्राच्या आवारात त्यांचे स्वागत केले.