11 हजार कोट्यधीशांनी लंडन सोडले; कर धोरण, व्यवसाय अन् शेअर मार्केटची अविश्वासार्हता

उंच इमारती, भव्य जीवनशैली आणि जागतिक बाजारपेठेची राजधानी म्हणून कधीकाळी लंडनची प्रतिष्ठा होती. मात्र आता हजारो करोडपती लंडनमधून बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. हेन्ली अँड पार्टनर्स आणि न्यू वर्ल्ड वेल्थ या कंपन्या संपत्तीचे विश्लेषण करत असतात. त्यांच्या अहवालानुसार, गेल्या 10 वर्षांत 12 टक्के करोडपती लंडनमधून बाहेर पडले आहेत. वाढता कर, व्यवसाय आणि नोकरीच्या संधी कमी होणे, आयटी आणि टेक क्षेत्रात घट, लंडन स्टॉक एक्सचेंजची घसरणारी विश्वासार्हता यामुळे लंडनमधून श्रीमंत लोक स्थलांतर करत आहेत.

गतवर्षी अर्थात 2024 मध्ये 11,000 हून अधिक करोडपती लंडन सोडून गेले आहेत. 2023 मध्ये 2,27,000 करोडपती लंडनमध्ये वास्तव्यास होते, तर आता ही संख्या 2,15,700 पर्यंत खाली आली आहे. एकूणच एका वर्षात सुमारे 11,300 धनाड्यांनी या शहराचा निरोप घेतला आहे. तेथील भांडवली नफा कर आणि मालमत्ता कर हे जगातील सर्वात महागड्या करांपैकी एक आहेत. अमेरिका आणि आशियाच्या तुलनेत लंडन आताच्या घडीला तंत्रज्ञान क्षेत्रात मागे आहे. तसेच लंडन स्टॉक एक्सचेंज टॉप-10 मध्येही नाही.

आशिया आणि अमेरिकेकडे कल

लंडन सोडणारे करोडपती आता आशिया आणि अमेरिकेकडे वळत आहेत. तेथील चांगले कर धोरण, तांत्रिक प्रगती आणि नवीन व्यवसाय संधी अनेकांना आकर्षित करत आहे. मागील 10 वर्षांत सिंगापूरमध्ये करोडपतींची संख्या 62 टक्के वाढली आहे. दुबई, लॉस एंजेलिस आणि टोकियोसारख्या शहरांमध्ये राहण्याकडे श्रीमंत लोकांचा कल आहे. सध्या जगातील 10 सर्वात श्रीमंत शहरांपैकी सात शहरे अमेरिका आणि आशियामध्ये आहेत. यामध्ये न्यूयॉर्क, बे एरिया, लॉस एंजेलिस, शिकागो, टोकियो, सिंगापूर आणि हाँगकाँगचा समावेश आहे.

लॉस एंजेलिसची सरशी

लॉस एंजेलिसने लंडनला मागे टाकून जगातील पाचवे सर्वात श्रीमंत शहर होण्याचा मान पटकावला आहे. नवीन अहवालानुसार करोडपती आता अमेरिकेकडे आकर्षित होत आहेत. जर लंडन सरकारने कर धोरणांमध्ये सवलत दिली, गुंतवणूक वाढवली तर लंडनला पुन्हा जुने दिवस येतील, असे तज्ञांचे मत आहे.