‘गुड टच, बॅड टच’ कळला; नराधम बाप गजाआड गेला, उल्हासनगर पोलिसांच्या व्याख्यानानंतर पर्दाफाश

‘गुड टच व बॅड टच’ म्हणजे काय याचे धडे विविध स्वयंसेवी संस्था तसेच पोलिसांकडून शाळेत विद्यार्थिनींना दिले जात आहेत. उल्हासनगरच्या अशाच एका शाळेत पोलिसांनी मुलींना व्याख्यान दिले. तसेच गुड टच व बँड टच नेमका कसा ओळखायचा याच्या टिप्सदेखील दिल्या. याची सविस्तर माहिती ऐकून सावधान झालेल्या अल्पवयीन मुलीला चक्क आपल्या जन्मदात्या पित्यानेच केलेला ‘बॅड टच’ आठवला. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, पण मोठ्या धिटाईने तिने आपल्यावर ओढवलेला दुर्धर प्रसंग शिक्षिकेला सांगितला. त्यानंतर या क्रूरकर्माचा पर्दाफाश झाला. आपल्याच मुलीसोबत गैरकृत्य करणाऱ्या क्रूर बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी महिला पोलिसांना शाळेत जाऊन व्याख्यान देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार महिला उपनिरीक्षक आशा निकम यांनी शाळेत जाऊन विद्यार्थिनींना गुड टच, बॅड टच म्हणजे काय हे समजावून सांगितले. दरम्यान व्याख्यान ऐकत असलेल्या एका 11 वर्षीय विद्यार्थिनीने तिच्यासोबत झालेला गैरप्रकार शिक्षिकेला सांगितला आणि बापाच्या क्रूरकर्माचा पर्दाफाश झाला.

आईने दिली तक्रार

नराधम बापाचा पीडित विद्यार्थिनीच्या आईसोबत घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर पीडित विद्यार्थिनी व तिची बहीण बापासोबत राहतात. दरम्यान शिक्षिकेने पीडितेच्या आईला बापाच्या गैरकृत्याची माहिती देताच संतापलेल्या आईने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेत नराधम बापाविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी विकृत बापाविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.