
बदलापुरात दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्ही महिला सुरक्षेसाठी यॅव करू आणि त्यॅव करू अशा वल्गना केल्या असतानाच ठाण्यात महिला आणि मुली सुरक्षित नसल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील भंडार आळीत एका 11 वर्षीय चिमुकलीचा मिंधे गटाचा उपविभागप्रमुख सचिन यादव यानेच विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली. मात्र या नराधमाला तत्काळ जामीन झाल्याने भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन या विकृतावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ठाणे येथील भंडारआळी परिसरात पिडीत मुलगी राहते. ती सातवीत शिकत असून मिंधेचा नराधम पदाधिकारी सचिन यादव हा देखील भंडारआळी परिसरात राहतो. दुपारी दीडच्या सुमारास सचिनने पीडित मुलीच्या इमारतीतच तिचा विनयभंग केला. यावेळी त्याला रहिवाशांनी रंगेहाथ पकडले. यानंतर पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून सचिनला अटक केली. मात्र थातूरमातूर गुन्हा दाखल केल्याने या नराधमाची लगेच सुटका झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात चिमुरडय़ा असुरक्षित नराधमाला जामीन झालाच कसा?
मिंधे सरकारने निवडणूक लाडकी बहीण योजना खरी मात्र मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच चिमुकल्या मुली असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. या घटनेने ठाण्यात एकच खळबळ उडाली असून या नराधमाला जामीन झाला कसा? असा संतप्त सवाल पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केली आहे. सचिन यादव याच्यावर पोक्सो अंतर्गत कठोर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
माजी नगरसेवक पवन कदमचा निकटचा साथीदार
आरोपी नराधम सचिन यादव हा भांडार आळी येथील मिंधे गटाचा उपविभागप्रमुख आहे. तसेच माजी नगरसेवक पवन कदम यांच्या अत्यंत जवळचा साथीदार असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. गेल्या अनेक दिवसापासून तो चिमुरड्या मुलीसोबत हे घृणास्पद कृत्य करत होता. मात्र जिवाच्या भीतीने तिने घाबरून ही घटना कोणालाही सांगितली नाही. मात्र त्याला रंगेहाथ पकडल्यानंतर स्थानिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केला. दरम्यान एक माजी नगरसेवक मध्यस्थीसाठी पोलीस ठाण्यात आला मात्र त्याला संतप्त स्थानिकांनी हाकलून दिले.
नराधमाचा जामीन रद्द करण्यासाठी सत्र न्यायालयात अपील करण्याची मागणी
पोलिसांनी अटक केलेल्या यादवला जामीन मिळाल्याच्या निषेधार्थ आज संध्याकाळी भाजपच्या महिला कार्यकर्त्या ठाणे नगर पोलीस ठाण्यावर धडकल्या. आरोपी नराधमाला जामीन कसा मंजूर झाला याचा जाबही त्यांनी वरिष्ठ पोलिसांना विचारला. तसेच या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. नराधम आरोपीचा जामीन रद्द करण्यासाठी सत्र न्यायालयात अपील करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.