11 मार्च हा दिवस ‘मैत्री दिन’ म्हणूनही साजरा करावा, अभिनेता विनीतकुमार यांची मागणी

‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करणारा विकी कौशल, येसूबाईंच्या भूमिकेतील रश्मिका मंदाना यांच्याप्रमाणेच कवी कलश यांची भूमिका करणारे अभिनेते विनीतकुमार यांची सर्वत्र चर्चा आहे. विनीतकुमार यांच्या अभिनयाची, संवादफेकीची दर्शकांकडून प्रशंसा होत आहे. 11 मार्च हा छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस ‘मैत्री दिन’ म्हणूनही साजरा केला जावा, अशी मागणी विनीतकुमार यांनी केली आहे.

संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या अतूट मैत्रीचे दाखले दिले जातात. औरंगजेबाने दोघांचीही 11 मार्च 1689 रोजी क्रूर हत्या केली होती. संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीने शारीरिक छळ केला गेला तसाच छळ कवी कलश यांचाही केला गेला. दोघांनीही असह्य यातना सहन केल्या. मरण पत्करले, पण औरंगजेबासमोर शरणागती पत्करली नाही. संभाजीराजे व कवी कलश यांची सच्ची मैत्री, स्वाभिमान, राष्ट्राभिमान व धर्माभिमानासमोर प्रत्येक हिंदुस्थानीने नतमस्तक व्हावे, अशा भावना विनीतकुमार यांनी व्यक्त केल्या.