
हिंदुस्थानात अद्याप 5 जी सेवा लाँच केली जात असताना चीनने मात्र थेट 10 जी इंटरनेट सेवा लाँच केली आहे. हुवावे आणि चाइना युनिकॉम या दोन दिग्गज कंपन्यांनी हेबेई प्रांतातील झियोंगआन न्यू एरिया येथे देशातील पहिले 10 जी मानक ब्रॉडबँड नेटवर्क लाँच केले. यामुळे 90 जीबीची फाईल फक्त 72 सेकंदांत डाऊनलोड होईल. 10 जी इंटरनेट सेवेमुळे 9,834 मेगाबिट्स प्रतिसेकंद (एमबीपीएस) डाऊनलोड, तर 1008 एमबीपीएस अपलोड वेग मिळणार आहे.
10 जी इंटरनेट सेवेमुळे चीनमध्ये आता 4 के चित्रपट अवघ्या सेकंदात डाऊनलोड होतील. व्हर्च्युअल रिअॅलिटी गेम खेळणे, सोशल मीडिया अॅप्स हाताळणे खूपच स्मूथ आणि सोपे होणार आहे. चीनने जगात सर्वात आधी 10 जी इंटरनेट सेवा लाँच केल्याने जागतिक टेक्नोलॉजीमध्ये चीनचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सध्या मिळणाऱ्या नेटवर्कच्या तुलनेत चीनचे हे नेटवर्क 10 पट वेगवान आहे.