
घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेने बेकायदा होर्डिंग्जचा प्रश्न ऐरणीवर आला. पालिका अधिकारी आणि होर्डिंग माफिया यांचे लागेबांधे असल्याचे उघडकीस आले. त्यानंतरही बेकायदा होर्डिंग्जला चाप बसलेला नाही. शहरात रेल्वेच्या जमिनीवर तब्बल 103 बेवारस होर्डिंग्ज उभी आहेत. ही होर्डिंग्ज उभारण्यासाठी पालिका प्रशासनाकडून परवानगी घेतली नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई शहरात उभ्या असलेल्या होर्डिंग्जचा तपशील पालिका प्रशासनाकडे माहितीच्या अधिकारातून मागितला होता. त्यांच्या अर्जावरील उत्तरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मध्य व पश्चिम रेल्वेची मालकी असलेल्या जमिनींवर एकूण 306 होर्डिंग्ज उभारण्यात आली आहेत. त्यात मध्य रेल्वेच्या जमिनीवर 179, तर पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर 127 होर्डिंग्ज आहेत. विशेष म्हणजे यापैकी मध्य रेल्वेच्या 179 होर्डिंग्जपैकी 68 आणि पश्चिम रेल्वेच्या 127 होर्डिंग्जपैकी 35 होर्डिंग्ज कोणी बसवले याची माहिती पालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाही. घाटकोपरमध्ये गेल्या वर्षी घडलेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने पारदर्शकता राखणे गरजेचे आहे. पालिकेच्या नियमांचे पूर्णपणे पालन करणे आवश्यक आहे. असे असतानाही शहरात बेकायदा होर्डिंग्ज उभी कशी राहतात? जे होर्डिंग्ज बेकायदेशीरपणे उभे आहेत ते रेल्वे प्रशासनाने तातडीने हटवावे. तसेच बेकायदा होर्डिंग्ज उभारणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.
प्रभागनिहाय आकडेवारी
पालिका प्रशासनाकडील नोंदीनुसार, पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर ए वॉर्डात 3, डी वॉर्डात 1, जी दक्षिण-2, जी उत्तर- 12, के पूर्व- 2, के पश्चिम- 1, पी दक्षिण- 10 तर आर दक्षिण वॉर्डात 4 असे 35 होर्डिंग्ज उभे आहेत. मध्य रेल्वेच्या जमिनीवर ई वॉर्डात 5, एफ दक्षिण वॉर्डात 10, जी उत्तर- 2, एल वॉर्ड- 9 आणि टी वॉर्ड- 42 असे 68 होर्डिंग्ज उभे आहेत. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या हद्दीतील या एकूण 103 होर्डिंग्जचा कोणीही मालक नाही.