नोटबंदीचे भूत मानगुटीवरून सुटेना, राज्यातील 8 जिल्हा सहकारी बँकांकडे 101 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा पडून

केंद्र सरकारने 2016 साली 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. आता या राज्यातील 8 जिल्हा सहकारी बँकांकडे या 500 आणि एक हजार रुपयांच्या 101 कोटी रुपये पडून आहेत. रिझर्व्ह बँकेने या नोटा घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या बँकांना 101 कोटी रुपयांचा तोटा दाखवावा लागणार आहे. दुसरीकडे या नोटा सांभाळताना बँकांच्या नाकी नऊ येत आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. गेल्या 8 वर्षांपासून राज्यातील 8 जिल्हा बँकांकडे नोट बंदीच्या 101 कोटी रुपयांच्या नोटा आहेत. सर्वाधिक नोटा कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकांकडे असून त्यांच्याकडे 25.3 कोटी रुपये आहेत. तर पुणे जिल्हा सहकारी बँकांकडे 22.2 कोटी रुपयांच्या नोटा आहेत.

या नोटा वेळेत डिपॉजिट न केल्याने रिझर्व्ह बँकेने या नोटा बदलून देण्यास नकार दिल्याचे एका बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितले. खातेधारकांना आम्ही नोटा बदलून दिल्या, पण रिझर्व्ह बँकेने या नोटा घेण्यास नकार दिल्याने त्याचा फटका आम्हाला बसतोय. आता नोटबंदीच्या नोटांची रक्कम आम्हाला ही तोट्यात दाखवावी लागेल असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

एकीकडे या नोटा बदलून मिळत नाही त्याची चिंता आणि या नोटा सांभाळून ठेवण्याचेही या बँकाना आव्हान आहे. या बँकांना वाळवी लागू नये म्हणून त्यावर सतत स्प्रे आणि औषधं मारावी लागतात. इतकंच नाही तर एवढ्या नोटा जपून ठेवण्यासाठी बँकाना वेगळी जागाही करावी लागली आहे.

नोटबंदी झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांना या नोटा बदलून देण्याची परवानगी दिली होती. पण काळ्या पैसा आणि गैरव्यवहाराच्या भितीने रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांकडून या नोटा घ्यायच्या बंद केल्या. जून 2017 मध्ये सहकारी बँकाकडून रिझर्व्ह बँकानी या नोटा बदलून द्यायला होकार दिला. पण 2016 साली ठराविक काळात डिपॉझिट केलेल्या नोटाच बदलून देणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले.

तेव्हा 31 जिल्हा बँकांकडे 2 हजार 770 कोटी रुपये किंमतीच्या 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा होत्या. सर्वाधिक नोटा या पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या होत्या. या बँकेकडे 811 कोटी रुपयांच्या नोटा होत्या. त्यानंतर सातारा जिल्हा सहकाही बँकेकडे 399 कोटी रुपयांच्या नोटा होत्या. आता 31 पैकी 8 जिल्हा बँकांकडे 101 कोटी रुपयांचा जुन्या नोटा पडून आहेत. ठराविक काळात या नोटा डिपॉझिट न केल्याने रिझर्व्ह बँकेने या नोटा बदलून देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हे नुकसान बँकांना सहन करावे लागणार अशी चिन्ह आहे.