शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचा आज शुक्रवारी (दि. 5) गणेश कला क्रीडा मंच येथे शुभारंभ होणार आहे. यानिमित्त सकाळी 9 वाजता बालगंधर्व रंगमंदिरापासून भव्य नाटय़ यात्रा आणि दुचाकी रॅली निघणार आहे. यात कला क्षेत्रातील अनेक कलाकार सहभागी होणार आहेत.
त्यानंतर सकाळी 10 वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे रंगमंच पूजन होणार असून त्यानंतर नाटय़ सकीर्तन, शिवराज्याभिषेक सोहळा, बहुरूपी भारुड, लावणी आणि संध्याकाळी 5 वाजता शंभराव्या नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, नाटककार व माजी अध्यक्ष प्रेमानंद गज्वी व कला आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते नाटय़ संमेलनाचा शुभारंभ होणार आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरात नाटय़ संमेलनाच्या पूर्वसंध्येला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये शतक महोत्सवी मराठी नाटय़ संमेलन शनिवार (दि. 6) आणि रविवारी (दि. 7) होणार आहे. श्री मोरया गोसावी संकुल, केशवनगर, चिंचवड येथे या नाटय़ संमेलनाचा मुख्य सभामंडप असणार आहे. तर भोईरनगर येथे बालनाटय़नगरी उभारण्यात आली आहे. शिवाय पिंपरी-चिंचवड शहरातील चार नाटय़गृहांमध्ये वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम व नाटकांची मेजवानी रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. दोन दिवस चालणाऱया या नाटय़ संमेलनात जवळपास 64 कलांचा समावेश असलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मुलाखती, परिसंवाद, एकांकिका, प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांची रेलचेल असणार आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता सर्व नाटय़गृहांत रंगभूमी पूजन, सायंकाळी पाच वाजता बालनगरीचे उद्घाटन, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘अतित्व’ हे नाटक भरत जाधव आणि टीम रात्री 9 वाजता सादर करणार आहेत. सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाटय़गृहात सायंकाळी पाच वाजता ‘अडलंय का?’ हे नाटक होणार आहे.