दादरमधील शंभर वर्षांची हरिभाऊ वाद्य कंपनी बंद, हजारो संगीतप्रेमींची निराशा

मंगेश दराडे, मुंबई

तब्बल शंभर वर्षे संगीतमय परंपरा जपणारे आणि नव्या-जुन्या संगीत वाद्यांचा ठेवा असलेली हरिभाऊ विश्वनाथ आणि कंपनीची दादरमधील शाखा अखेर बंद झाल्याने संगीतप्रेमींची निराशा झाली आहे. यानिमित्ताने दादरमधील मराठी माणसाचे आणखी एक दुकान बंद पडले आहे. कंपनीची दादरमधील शाखा बंद झाली असली तरी गिरगाव तसेच प्रभादेवीच्या रचना संसदसमोरील शाखा सुरूच राहणार आहेत.

हरिभाऊ विश्वनाथ दिवाणे यांनी 1925 साली दादर पश्चिमेला स्वतःच्या नावाने कंपनी सुरू केली. त्यावेळी येथे पत्र्याच्या साध्या शेडमध्ये हार्मोनियम, ग्रामोफोन दुरुस्तीचे काम चालायचे. पुढे त्यांनी हार्मोनियम, मेंडोलीन, व्हायोलीन, तबला डग्गा अशा वाद्यांची निर्मिती करण्यासाठी कुंभारवाडा आणि नगरला कारखाना सुरू केला. कंपनीच्या शाखेत हार्मोनियम, तबला, सतार, तानपुरा, ढोलकी, की-बोर्ड, गिटार, मेंडोलीन, व्हायोलीन अशी शंभरहून अधिक वाद्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पंडित भीमसेन जोशी, वसंत देसाई, माणिक वर्मा, प्यारेलाल, यशवंत देव, अशोक पत्की अशा दिग्गजांनीदेखील या दुकानाला भेट दिली आहे. दादरच्या शाखेचे व्यवस्थापन 1978 पासून हरिभाऊ यांचे पुतणे उदय दिवाणे यांनी सांभाळले.

दादरला लोकांची गर्दी आणि फेरीवाल्यांचा उच्छाद वाढलाय. आमच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना गाडी पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसते. ग्राहकांनी खरेदी केलेली वाद्ये गर्दीतून त्यांच्या गाडीपर्यंत सुखरूप पोहोचवणे अवघड टास्क असतो. ऑनलाईन खरेदीचा मोठा फटका आम्हाला बसलाय. त्यामुळे दादरची शाखा बंद करून प्रभादेवीच्या शाखेत स्थलांतरित केली आहे. त्या माध्यमातून संगीत सेवा सुरू ठेवू, असे हरिभाऊ विश्वनाथ आणि कंपनीचे भागीदार दिनेश दिवाणे म्हणाले.