एका लग्नाची दुसरी गोष्ट, वराचे वय 100 तर वधू 102 वर्षांची

हिंदुस्थानात सध्या लग्नसराईची धूम सुरू आहे, परंतु अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील एका लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 100 वर्षांचा वर आणि 102 वर्षांची वधू यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. वराचे नाव बर्नी लिटमॅन तर वधूचे नाव मार्जोरी फिटरमॅन असे आहे. या दोघांच्या लग्नानंतर सर्वात जास्त वयात लग्न करणाऱ्या या दोघा दाम्पत्यांच्या लग्नाची गिनीज वर्ल्ड बुकात नोंद करण्यात आली आहे. वर आणि वधू या दोघांचे मिळून वय 202 वर्षे आहे.

बर्नी आणि मार्जोरी हे दोघे 9 वर्षांपूर्वी एका पार्टीत एकमेकांना भेटले होते. त्या दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात आले. नंतर प्रेमात पडले आणि अखेर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. बर्नी आणि मार्जोरी या दोघांचेही आधी लग्न झालेले आहे, परंतु त्यांचे जीवनसाथी आता जिवंत नाहीत. दोघांनाही मुले आहेत, परंतु ते आपापल्या कामात व्यस्त आहेत. दोघांनीही एकमेकांना समजून घेत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी पुढाकार घेत हे लग्न लावून दिले. लग्नाआधीही हे दोघे एकमेकांना भेटत होते.

एकाच विद्यापीठातून शिक्षण

प्रेमाला कोणतेही बंधन नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शंभरी ओलांडल्यानंतरही या दोघांनी आयुष्याला नवी सुरुवात केली आहे. बर्नी आणि मार्जोरी यांनी पेनसिल्वेनिया विद्यापीठात शिक्षण घेतले, परंतु त्यांची ओळख झाली नव्हती. बर्नी व्यवसायाने एक इंजिनीअर होते तर मार्जोरी एक शिक्षिका म्हणून काम करत होती. लग्नानंतर हे दोघेही आता आनंदी आहेत. सर्वाधिक वय असलेल्या जोडप्याने लग्न करण्याचा रेकॉर्ड आता या जोडींच्या नावावर झाला आहे.