दक्षिण आफ्रिकेतील सोन्याच्या खाणीत बेकायदेशीरपणे खाणकाम करणाऱ्या किमान 100 खाण कामगारांचा उपासमारीमुळे मृत्यू झाला आहे. हे सर्व कामगार मागील दोन महिन्यांपासून खाणीत अडकले होते. पोलिसांनी त्यांना बाहेर निघण्याचे आवाहन केले होते, मात्र अटकेच्या भीतीने ते आतमध्येच राहिल्याचे खाण कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका गटाने सांगितले. कामगारांनी बाहेर निघण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी खाणीत ये-जा करण्याचा मार्ग बंद करून कामगारांची कोंडी केली. त्यामुळे सर्व कामगार खाणीत अडकून पडले. खाणीत वेगवेगळ्या ठिकाणी 500 खाण कामगार अडकले असल्याची भीती आहे.
सुटका करण्यात आलेल्या एका कामगाराकडे फोन सापडला, ज्यामधील व्हिडीओत खाणीच्या आतील मृतदेहांची दृश्ये दिसत आहेत. खाण कामगारांसाठी प्रसिद्ध असलेल्या सिलफाँटेनच्या उत्तरेकडील शहराजवळील बफेल्सफॉंटेन सोन्याच्या खाणीत आणखी किती बेकायदेशीर खाण कामगार भूमिगत आहेत याचा आकडा अद्याप समोर आला नाही, असे पोलिसांनी सांगितले. कामगारांना बाहेर काढण्यासाठी नोव्हेंबरमध्ये प्रथम ऑपरेशन सुरू करण्यात आले. शुक्रवारपासून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
देशातील सर्वात खोल खाण
दरम्यान, ही खाण 2.5 किलोमीटर खोल असून ती देशातील सर्वात खोल खाण आहे. याआधी खाणीतून बाहेर आणलेल्या मृतदेहावरील प्राथमिक शवविच्छेदन अहवालात कामगारांचा उपासमारीने मृत्यू झाला असे दिसून आले, असे कामगारांशी संबंधित असलेल्या सामाजिक संस्थेने सांगितले, बचाव पथकाने एक पिंजरा तयार केला आहे. हा पिंजरा 3 कि.मी. खाली उतरवला असून पिंजऱ्याच्या मदतीने उर्वरित लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.