
मनपसंत गाणी ऐकून आपल्याला फ्रेश वाटते. काही गाणी आपल्या वेदनेवर फुंकर घालतात. गाण्यांच्या जोरावर अनेक चित्रपट हिट होतात. पण एक गाणे असे आहे, ज्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. या एका गाण्यामुळे 100 हून अधिक लोकांचे प्राण गेले आहेत. जगातील सर्वात अपशकुनी गाणे म्हणून ते ओळखले जाते. ‘ग्लूमी संडे’ असे या गाण्याचे नाव आहे. ते हंगेरियन गाणे आहे. रेज्जो सेरेस आणि लॅजलो यांनी ते एकत्रित लिहिले असून ते 1935 साली प्रदर्शित झाले होते. त्याच वर्षी एका व्यक्तीने गाणे ऐकून आत्महत्या केली. त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गाण्याचा उल्लेख होता.
‘ग्लूमी संडे’ च्या संगीतकाराच्या होणाऱ्या पार्टनरनेही विष पिऊन आत्महत्या केली होती. 1968 साली गाणे लिहिणाऱ्या रेज्जो यांनीही जीवन संपवले. एका महिलेने गाणं ऐकल्यावर पाण्यात उडी मारून जीव दिला, तर दोघांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली होती. या घटनांनंतर गाण्यावर बंदी घालण्यात आली.