अंदमान-निकोबारच्या नायब राज्यपालांच्या नियुक्तीसाठी 100 कोटींचा सौदा, काँग्रेसने मोदींना केलं लक्ष्य

अंदमान निकोबारच्या नायब राज्यपालांच्या नियुक्तीसाठी 100 कोटी रुपयांची सौदेबाजी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या सौद्यानुसार 30 कोटी रुपये आगाऊ द्यायचे होते. उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर द्यायची होती. 30 कोटी रुपयांपैकी 10 कोटी 46 लाख रुपये आरोपींना मिळाले आहेत. त्यापैकी एक कोटी रुपये खात्यावर पाठवण्यात आले. उर्वरित रकमेचा व्यवहार रोखीने करण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर काँग्रेसने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. ही 100 कोटींची रक्कम कोणाला मिळणार होती, याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावं, असं राज्यसभेचे खासदार आणि काँग्रेसचे महासचिव रणदीपसिंग सुरजेवाला म्हणाले आहेत. X वर एक पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत.

X वर पोस्ट करत रणदीपसिंग सुरजेवाला म्हणाले की, ”देशाची संपत्ती आणि संसाधने खाजगी हातात देणाऱ्यांनी नायब राज्यपाल हे घटनात्मक पद विकण्यावर आलेत. या संवैधानिक पदासाठी 100 कोटी रुपयांपैकी 10 कोटी 46 लाख रुपये देण्यात आलेत. जर हे प्रकरण पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयासमोर आले नसते तर घटनात्मक पदांचा लिलाव 100 कोटी रुपये देऊन पूर्ण झाला असता. ही 100 कोटींची रक्कम कोणाच्या झोळीत जाणार होती, याचे उत्तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्यावे.”