जम्मू-कश्मीर आणि हिमाचल प्रदेशात झालेल्या तुफान बर्फवृष्टीमुळे संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात थंडीने प्रचंड कहर केला आहे. थंडीच्या लाटेमुळे गेल्या 24 तासांत उत्तर प्रदेशात 8 आणि बिहारमध्ये 2 जणांना जीव गमवावा लागला. देशातील 14 राज्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दाट धुके पाहायला मिळत आहे. दिल्लीत शनिवारी 9 तास शून्य दृश्यमानतेची नोंद झाली. त्यामुळे विमान उड्डाणे तसेच 60 रेल्वेगाडय़ा उशिराने धावत होत्या. 3 आणि 4 जानेवारीला दिल्लीत 800 हून अधिक उड्डाणांना उशीर झाला. आज सकाळीही 160 उड्डाणे वेळापत्रकानुसार उडू शकली नाहीत. 3 दिवसांत 900 हून अधिक उड्डाणे प्रभावित झाली. राजस्थान, मध्य प्रदेशात थंडीपासून दिलासा मिळाला आहे.
- हिमाचलच्या अनेक जिह्यांमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू असून पारा घसरणार आहे
- हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, हरयाणा आणि दिल्लीत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.
- पंजाब, हरयाणा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरामध्ये दाट धुके राहणार आहे.