बलुचिस्तानमध्ये BLA चा मोठा हल्ला; आयईडी स्फोटाने पाकिस्तानी सैन्याचा ताफा उडवला, 10 सैनिक ठार

पहलगाम हल्ल्यानंतर एकीकडे हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये सीमेवरील तणाव वाढलेला असताना दुसरीकडे बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) पाकड्यांच्या नाकात दम आणला आहे. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला केला आहे. क्वेटाजवळ मार्गट भागामध्ये आईडीचा वापर करत बीएलएने पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्याला लक्ष्य केले. बीएलएने केलेल्या हल्ल्यात 10 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

शुक्रवारी बलुच लिबरेशन आर्मीने क्वेटातील मार्गट येथे पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्याला लक्ष्य करून आयईडी स्फोट घडवून आणला. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे 10 सैनिक ठार झाले आहेत. बीएलएने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत हल्ल्याचा व्हिडीओही जारी केला आहे. रिमोट कंट्रोल डिव्हाईसचा वापर करून हा हल्ला करण्यात आल्याचे बीएलएने म्हटले आहे.

आयईडी स्फोटामध्ये शत्रूचे वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून त्यात असलेले सर्वचे सर्व 10सैनिक ठार झाले आहेत. मृतांमध्ये सुभेदार शहजाद अमीन, नायब सुभेदार अब्बास, शिपाई खलील, शिपाई जाहिद, शिफाई खुर्रम सलीम आणि इतरांचा समावेश आहे, असे बीएलएचे प्रवक्ते जियांद बलोच यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच येत्या काळात पाकिस्तानी सैन्याविरुद्ध कारवाया आणखी तीव्र होतील असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, गेल्या काही काळापासून बलुचिस्तानचा लढा आणखी तीव्र झाला आहे. बलुच लिबरेशन आर्मी सातत्याने पाकिस्तानी सैन्याला टार्गेट करत आहे. गेल्या महिन्यामध्ये क्वेटाहून ताफ्तानच्या दिशेने जाणाऱ्या पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावरही बीएलएने हल्ला केला होता. यात 7 सैनिकांचा मृत्यू तर 21 जखमी झाले होते. बीएलएने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत पाकिस्तानचे 90 सैनिक ठार केल्याचा दावा केला होता.

एक्सप्रेसचे अपहरण

त्याआधी 11 मार्च रोजी क्वेटाहून पेशावरच्या दिशेने जाणारी जाफर एक्सप्रेस बीएलएने हायजॅक केली होती. ही एक्सप्रेस दुपारी दीडच्या सुमारास सिब्बी येथे पोहोचणार होती. मात्र बोलानच्या माशफाक बोगद्याजवळ यावर बीएलएने हल्ला करत एक्सप्रेसचे अपहरण केले होते. या एक्सप्रेसमध्ये पाकिस्तानी सैन्याचे अनेक अधिकारीही होते. यातील बहुतांश अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना ठार केल्याचा दावा बीएलएने केला होता.