मालाडमध्ये दोन गटांत राडा, प्रचंड तणाव; दहा जणांविरोधात गुन्हा नोंद

हिंदू नववर्षानिमित्त अर्थात गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत राडा झाल्यानंतर तणाव झाल्याची घटना रविवारी सायंकाळी मालाड परिसरात घडली. या प्रकरणी कुरार पोलिसांनी दहाजणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

गुढीपाडव्यानिमित्त कलश यात्रेचे आयोजन केले होते. त्या यात्रेत सहभागी होण्यासाठी आठजण मालाडच्या पठाणवाडीत परिसरातून जात होते. तेव्हा दोन गटांत वाद होण्यास सुरुवात झाली. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. घडल्या प्रकरणी आठजणांवर दुसऱ्या गटातील लोकांनी हल्ला केला. तेव्हा तेथून एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेची माहिती समजताच कुरार पोलीस घटनास्थळी आले. जखमी तरुणांना रुग्णालयात दाखल केले.

– दरम्यान, या मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पळून गेलेल्या हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत. त्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केल्याने परिसराला छावणीचे रूप प्राप्त झाले होते. कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशी कोणतीही कृती कोणी करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.