
हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. आपच्या प्रचाराची धुरा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. हरयाणाच्या दौऱ्यावर असलेल्या सुनीता केजरीवाल यांनी विधानसभेसाठी आपच्या पाच गॅरंटीची घोषणा केली. यामध्ये महिलांना दरमहा एक हजार रुपये, मोफत वीज, मोफत शिक्षणाची हमी देण्यात आली आहे.
आपने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला तर हरयाणातील पायाभूत सुविधात आमूलाग्र बदल करण्यात येतील. राज्यातील प्रत्येक तरुणाच्या हाताला काम मिळेल अशी व्यवस्था करण्यात येईल. सरकारी शाळा इतक्या चांगल्या बनविण्यात येतील की लोक खासगी शाळांमधून मुलांना काढून सरकारी शाळेत दाखल करतील, असा दावा सुनीता केजरीवाल यांनी यावेळी केला.
दिल्ली आणि पंजाबप्रमाणेच सर्व जुनी घरगुती बिले माफ केली जातील. तसेच, वीज कपात बंद करून 24 तास वीज पुरवठा केला जाईल. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल अशी व्यवस्था राज्यात उभारण्यात येईल. गाव आणि शहरात मोहल्ला क्लिनिक आणि नवीन सरकारी रुग्णालये बांधली जातील. आजार किरकोळ असो वा मोठा, प्रत्येक नागरिकासाठी संपूर्ण उपचार मोफत केले जातील, असे सुनीता केजरीवाल यांनी सांगितले.