ईडी अधिकारी असल्याची बतावणी करत एका व्यावसायिकाकडून दीड कोटी उकळणाऱ्या चार जीएसटी अधिकाऱ्यांवर ईडीने बुधवारी मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. बेंगळुरू शहर गुन्हे शाखेने त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. या आरोपांची दखल घेत ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याची कलमे आरोपींवर लावली आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जीएसटीचे निरीक्षक आणि वरिष्ठ गुप्तचर अधिकारी दर्जाच्या कर्मचाऱ्यांशिवाय अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे.
अशी केली फांदेबाजी
बायप्पानहल्ली पोलीस ठाण्यात या व्यापाऱ्याने केलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली. एक आठवड्यापूर्वी सुमारे चार ते पाच जण त्याच्या घरी आले व दोन वाहनांमध्ये त्याला जबरदस्तीने घेऊन गेले. त्याच्या कार्यालयातही नेले आणि तेथे त्यांनी मोठ्या रकमेची मागणी केली, अशी माहिती बेंगळुरूचे पोलीस आयुक्त बी. दयानंद यांनी दिली. या व्यापाऱ्याने सुमारे दीड कोटी रुपये दिल्यानंतर त्यांनी त्याला सोडून दिले. त्याच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात येऊन शहर गुन्हे शाखेने अपहरण आणि खंडणीच्या आरोपाखाली या चौकडीला अटक केली आहे, असे ते म्हणाले.