हिंदुस्थानी ज्ञान, विज्ञान आणि धर्माला जगात मान्यता, ‘गरू गीता’ ग्रंथाच्या प्रकाशनावेळी नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

आंतर योग फाऊंडेशनचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरू आचार्य उपेंद्र  यांच्या ‘गुरू गीता’ या ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते फोर्ट येथील आंतर योग गुरुकुल येथे दिमाखात संपन्न झाले. हिंदुस्थानी ज्ञान, विज्ञान आणि धर्माला जगात प्रतिष्ठा असून आचार्य उपेंद्र  यांची पुस्तके जगाच्या कल्याणासाठी महत्त्वाचे काम करतील, असे गौरवोद्गार नितीन गडकरी यांनी यावेळी काढले.

‘गुरू गीता’ या ग्रंथात आध्यात्मिक सद्गुरू आचार्य उपेंद्र  यांनी ‘गुरू गीते’च्या गहन शिकवणीचे विश्लेषण अचूकपणे केले आहे. यात गुंतागुंतीच्या आध्यात्मिक संकल्पनांना साध्या भाषेत मांडले आहे. हा ग्रंथ केवळ गुरू परंपरेचे शाश्वत महत्त्व अधोरेखित करत नाही तर आध्यात्मिक यात्रेला अधिक गती देण्याची प्रेरणादेखील देतो. यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, आपण आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये कधीही स्वतःसाठी काही मागत नाही, तर संपूर्ण जगाच्या कल्याणाची कामना करतो. आचार्य उपेंद्र यांनी नुकताच जो महाचंडी होम आयोजित केला होता, त्याचा उद्देशही जगाचे कल्याण व्हावे हाच होता. त्यांनी लिहिलेली ही पुस्तकेसुद्धा जगाच्या कल्याणासाठी आणि त्यातून जगाला शांती आणि भरभराट प्राप्त व्हावी या दृष्टीने मत्तवची ठरतील. ही पुस्तके धार्मिक ज्ञान, विज्ञान, धर्म, इतिहास यांचा आधार घेऊन लिहिली गेली आहेत.

हिंदुस्थान आज विश्वगुरू होण्याच्या मार्गावर आहे. पण आपल्याला त्याआधी गुरू म्हणजे काय, हे समजून घ्यावे लागेल. महाभारतात भगवान श्रीकृष्ण यांनी ते उलगडून सांगितले होते. मला स्कंद पुराणामध्ये ‘गुरू गीता’ या सर्व मार्गदर्शनासाठी उपलब्ध असल्याचे लक्षात आले. पण त्यावरील भाष्य उपलब्ध नव्हते. त्या गोष्टी या भाष्यांसह या पुस्तकात दिल्याचे आचार्य उपेंद्र यावेळी म्हणाले.