स्वयंपाकघर – गाण्या-खाण्याची गोष्ट

>> तुषार प्रीती देशमुख

आमच्या मुलांना चहादेखील करता येत नाही. ही पार पालकांनी करण्यापेक्षा आपल्या मुलांना सगळा स्वयंपाक करता येतो असं म्हणायला पाहिजे. म्हणजेच त्यांनी मुलांना लहानपणापासूनच स्वयंपाक करण्याची आवड निर्माण करून तो कसा बनवायचा त्याचं योग्य मार्गदर्शन केलं तर मुलं कधीच उपाशी राहणार नाहीत. त्यांना किमान स्वयंपाक करायला यावा ही आता काळाची गरजच आहे.

आई मी तुला असे छान छान पदार्थ करून खाऊ घालीन, की त्यामुळे तुला आणखीन छान गाता येईल.’ असं आपल्या आईला सांगणारा कुशान, म्हणजेच लोकप्रिय गायिका वैशाली सामंत यांचा मुलगा.
कुशानने स्वयंपाक घरात पहिलं पाऊल टाकलं तेव्हा तो तीन वर्षांचा होता. त्याची पणजी निर्मला जोशी व आजी स्वयंपाक घरात पोळ्या करत असताना तो स्वयंपाकघरात शिरून मला पण कणीक मळायची आहे असा आजीकडे हट्ट धरायचा. स्वयंपाक करताना मध्येमध्ये नातवाची लुडबूड नको म्हणून आजीने एका छोटय़ा ताटात थोडंसं पीठ व पेलाभर पाणी देऊन त्याला स्वयंपाकघराच्या कोपऱयात बसवून छान पीठ मळून दे, असं सांगितलं. पिठात हात घालताच तो त्याबरोबर खेळू लागला, थोडं थोडं पाणी घालत आजीला सारखं सारखं विचारून त्रास देत पीठ साधारण योग्य पद्धतीने मळून दिलं. तेव्हा आजीलाही आश्चर्य वाटलं. मग कुशानने आजीकडे पोळी लाटण्यासाठी पोळपाट-लाटणं मागितलं. तेव्हा आजीने त्याला पिठाचे छोटे गोळे करून पोळी कशी लाटायची हे दाखवलं. आजी-नातवाची ही सर्व गंमत कुशानच्या आईवडिलांने पाहिली त्याचवेळी दोघांनी ठरवलं की कुशानला पदार्थ बनवण्याची आवड असेल तर त्याला ते करण्यासाठी, शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं.

त्याची पणजी व दोन्ही आज्या त्याची आवड पाहून, त्याने स्वयंपाकघरात कितीही पसारा केला तरी त्या त्याला ते पदार्थ करायला शिकवत होत्या. कुशानचे वडील दत्तात्रय सामंत यांनादेखील चवीने खाण्याची व पदार्थ बनवण्याची प्रचंड आवड. त्यांच्या आई संगीता सामंत सुगरण आहेत. यांच्या हातचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले माशांचे प्रकार म्हणजे घरच्यांसाठी एक खाद्यपर्वणी असायची. त्यांनी आपल्या पुढच्या पिढीला हे पदार्थ तसे बनवता यावे म्हणून लिहून ठेवले आहेत. दत्तात्रयजी त्या पध्दतीने ते सर्व पदार्थ बनवतात आणि आईच्या हातच्या चवीचा आस्वाद घेऊन शकतात. त्यांना कुशान यात खूप मदत करत असतो आणि स्वतही ते पदार्थ शिकत असतो. कुशान वडिलांसारखाच चवीचं खाणारा असल्यामुळे, पदार्थाचा एक घास घेताच मीठ-मसाल्यांची योग्य चव त्याला कळते.

कुशानच्या आईने कुशानची ही पाककलेची आवड ओळखून त्याला अभ्यासाबरोबर लहान वयातच या दिशेने योग्य प्रशिक्षण देण्याचं ठरवलं. स्वयंपाकघरातल्या वस्तू कशा हाताळायच्या, गॅस लावण्यापासून सुरी हाताळण्यापर्यंत योग्य मार्गदर्शन लहान वयात घेतल्यामुळे कुशानला खाण्यासाठी कुणावरही अवलंबून राहावं लागत नाही. त्याला वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळे पदार्थ करण्याची आवड असल्यामुळे ते विशिष्ट पदार्थ करताना लागणारी उपकरणं तो सहजपणे हाताळतो. एखादा पदार्थ बनवण्याआधी त्या पदार्थाची पूर्ण माहिती घेऊन त्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन तो ते पद्धतशीरपणे तयार करतो. छान सजावट करून सगळ्यांना आनंदाने खाऊ घालतो.

कुशानला केक करायला खूप आवडतात. आजपर्यंत तो प्रयत्नपूर्वक अनेक प्रकारचे केक शिकला आहे. आई-वडिलांच्या वाढदिवसानिमित्त मुलाकडून त्याने बनवलेल्या केकची भेट मिळाणं यापेक्षा दुसरा आनंद तो कोणता! अशा पद्धतीने कुशानला आईबाबा, देन आज्या आणि पणजीचे योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे तो उत्तम पदार्थ बनवतो आणि त्या पाकािढयेचा आनंद घेत असतो. कुशानला सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. कुशान लहान असताना शनिवार-रविवार शाळेच्या सुट्टीच्या दिवशी माझ्याकडे प्रशिक्षण घ्यायला यायचा. त्याला जेवढं मी शिकवलं त्याच्या चौपट त्याने आचरणात आणल्याने मला त्याचं खूप कौतुक वाटतं.

अनेक आई-वडिलांची इच्छा असते आपल्या मुलांनी आपल्या क्षेत्रात पुढे यावं. पण काही आई-वडील आपल्या मुलांना त्यांची आवड ज्या क्षेत्रात आहे त्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना पुढे येण्यासाठी प्रेरित करतात आणि मुलं नक्कीच यशस्वी होतात. कारण त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळालेलं असतं. कुशानच्या बाबतीत असंच घडत आहे. पुढे करिअरसाठी कोणतं क्षेत्र निवडावं हे तो ठरवेलच. पण त्याला आवडणाऱा गोष्टीत प्रोत्साहन देण्याचं काम करणारी त्याची आई म्हणजेच सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत व कुटुंबीय करत असल्यामुळे कुशान आईला प्रेमाने म्हणतो ‘आई तू गात रहा मी तुझ्यासाठी पदार्थ बनवतो.’ अशी ही आई-मुलाची गाण्या-खाण्याची खुसखुशीत गोष्ट प्रेरक आहे. कुशानला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि त्याला प्रोत्साहन देणाऱया आईचे मनापासून आभार.

आपणदेखील आपल्या मुलांना असंच प्रोत्साहन द्या. त्यांना त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करा हीच नम्र विनंती.

[email protected]
(लेखक युटय़ूब शेफ आहेत.)