>> प्रा. अनिल कवठेकर
रणदीप हुडा चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वीचे काही नायक या क्षेत्रात काहीतरी वेगळे करत होते. आमीर खान परफेक्शनिस्ट, शाहरुख खान रोमँटिक हीरो, अक्षय कुमार अॅक्शन हीरो म्हणून प्रसिद्ध झाले. प्रत्येकाला स्वत:मधील गुणवत्ता, कमतरता माहीत होत्या. त्यांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले असे नाही. रणदीप हुडाचे सिनेमे पाहताना असे लक्षात येते की, काहीसा वेगळा विचार करून त्याने सिनेसृष्टीत प्रवेश केलेला आहे. तो एक प्रयोगशील अभिनेता आहे. पण एवढे वेगळ्या विषयावरचे चित्रपट असूनही त्याचे चित्रपट लोकांपर्यंत का पोहोचू शकत नाहीत याचा विचार रणदीपने करायला हवा.
चित्रपटातल्या अनेक भूमिका अनेक नायकांनी जिवंत केल्या आहेत, तर कधी नायक ती भूमिकाच होऊन जातो. त्या भूमिकेसाठी तो वाटेल ते परिश्रम घ्यायला तयार असतो. अशा नायकांपैकी एक नायक म्हणजे रणदीप हुडा होय. ‘दंगल’च्या वेळी आमीर खानने वजन वाढवले होते. ‘बाहुबली’साठी प्रभासनेही आपले वजन वाढवले होते. या दोन्ही चित्रपटांमधून आमीर खानला आणि प्रभासला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि ते चित्रपट प्रचंड चालले. याच मार्गावरून चालताना रणदीपने ‘सरबजित’मधल्या भूमिकेसाठी 30 किलो वजन कमी केले होते. कारण ती एका पाकिस्तानातल्या तुरुंगात ठेवलेल्या कैद्याची भूमिका होती. ती भूमिका वास्तव वाटावी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध जाऊन त्याने आपले वजन घटवले होते. वर्तमानपत्रांतून, सोशल मीडियावर त्याची चर्चा झाली होती, पण चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याला त्याचा हवा तसा फायदा झाला नाही. या चित्रपटात पुरस्कार मिळाला तो ऐश्वर्या रायला. रणदीप खूप नाराज झाला. तुरुंगातला खंगलेला रणदीप, गलितगात्र, केस वाढलेला, जटा झालेला, भयानक कारावास, घरच्यांना भेटताना मनाची होणारी तगमग, त्याचे दात घासणे, चहा बनवणे, फटीतून येणाऱ्या सावल्यांचा मागोवा घेणे, त्याचा अस्वस्थपणा… हे सगळे होत असताना कॅमेरा ऐश्वर्यावर होता. हे सगळे अभिनयातून दाखवताना त्यासोबत हवे असतात प्रभावी संवाद. तिच्या संवादांतून त्याच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेच नाहीत. त्याला हवे तसे संवाद मिळाले नाहीत. दिग्दर्शकाने सरबजितऐवजी ऐश्वर्यावर फोकस ठेवण्याचे आधीच नक्की केलेले असावे. रणदीपला विनासंवादाचा उच्चस्तरीय अभिनय करण्याची संधी होती, पण तो कुठेतरी कमी पडला.
आपल्या लूकवर रणदीप प्रचंड मेहनत घेतो. त्याचा ‘सरबजित’ असो किंवा ‘हायवे’, सामान्य माणसांच्या गर्दीत त्याचे हीरोपण गळून जाते. तो त्या गर्दीचाच एक भाग बनून जातो आणि नायक म्हणून त्याचे वेगळे अस्तित्व थोडेसे जाणवायला हवे ते जाणवत नाही. रणदीपचे प्रयत्न कमी पडतात. जसे ‘हायवे’मधील बसमधल्या एका दृश्यात दोघेही बसच्या फ्लोअरवर झोपलेले आहेत. आलिया भट त्याच्या पायाजवळ झोपलेली आहे. दोघांमध्ये संवाद होतात, तेव्हा तो डोळे मिटून संवाद बोलतो. इतका इंटिमेट सीन असताना त्याने डोळे मिटून घेतलेत? त्याच वेळेला आलिया भटच्या डोळ्यांत जे भाव, खटय़ाळपणा दिसतो ते रणदीपच्या डोळ्यांत दिसत नाही. त्याच्या संवादातूनही तो भाव येत नाही. यातल्या अजून एका दृश्यात, आलिया रस्त्यातून जात असताना दोन तरुण तिला छेडतात. ती रणदीपला आवाज देते. रणदीप येऊन त्यांचे गळे पकडतो. इथे काहीतरी घडायला हवे होते. जे प्रेक्षकांना अपेक्षित होते. नायक फक्त गळा पकडत नाही तर त्याच्या डोळ्यांतील भाव, त्याच्या शारीरिक हालचालींमधली ऊर्जा, त्याला पाहून भीतीने समोरच्यांची उडालेली घाबरगुंडी, पण इथे असे काही घडत नाही. त्यामुळे रणदीपला मिळालेल्या संधीचे सोने करण्यात रणदीप कमी पडतो किंवा दिग्दर्शक त्याला तशी संधी देत नाही. नेमके प्रत्येक वेळी असे का घडते? हे एक चित्रपट अभ्यासक म्हणून मला पडलेले कोडे आहे.
‘हायवे’ ही एक वेगळी प्रेमकथा होती. त्यातून एक वेगळा कणखर नायक आपल्याला मिळाला असता. कारण आपल्या संरक्षणासाठी त्याने तिची ढाल केलेली असते. जिला कोठ्यावर विकण्याची त्याची तयारी असते, तोच तिच्या प्रेमात पडतो. त्यामुळे कथेच्या वेगळेपणातून रणदीपच्या स्वभावातला व संवादाला बदल दिसायला हवा होता, जाणवायला हवा होता पण तसे दिसले नाही. उलट ‘हायवे’मधली आलिया अधिक लक्षात राहते. आलियाचे नवखेपण कुठेही जाणवत नाही इतकी सहजता तिच्या अभिनयात दिसली होती. त्याच वेळी अत्यंत वेगळ्या नायकाची भूमिका असूनही त्याचा फायदा रणदीपला झालेला नाही.
रणदीपच्या ‘मेरे ख्वाबो में जो आए’मध्ये त्याचे नाव जय आहे आणि माया नावाच्या एका विवाहित तरुणीची कथा आहे. तिच्या लग्नाला दहा वर्षे झालेली असून तिला एक आठ-नऊ वर्षांची मुलगी आहे. माया ही एकेकाळी चांगली गायिका होती. तिच्या नवऱयाचे दुसऱ्या एका बाईवर प्रेम आहे. जय तिच्या स्वप्नात तिला प्रेरणा देणारा कृष्ण आहे. कृष्ण दिसण्यासाठी जो चेहऱयात गोडवा हवा, त्या गोडव्याचा रणदीपचा चेहराच नाही. गोड चेहऱयाच्या एखाद्या नायकाने ही भूमिका केली असती तर ती अधिक लोकांनी स्वीकारली असती. त्यामुळे ‘मेरे ख्वाबो में जो आये’ हाही पूर्णत मायाचा होऊन जातो. या सगळ्यात रणदीप दिसत राहतो, पण त्याचा प्रभाव पडत नाही.
चित्रपट मिळण्याच्या दृष्टीने रणदीप भाग्यवान आहे. त्याच्या ‘जॉन डे’मध्ये सतत सिगारेट ओढणारा, प्रेयसीला मारणारा व जीवनाचा कडवटपणा प्यायलेल्या ‘दिवार’मधल्या अमिताभसारखी भूमिका साकारत आहे. ‘दिवार’मधले संवाद इथे रिमिक्स करून वापरण्यात आले आहेत. यात रणदीपने नकारात्मक, क्रूर पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आहे. पण त्याला प्राण, रणजित, गुलशन ग्रोव्हर किंवा अमरीश पुरी सारखा प्रभाव पाडता आला नाही.
रणदीपचा उल्लेख केल्यानंतर ‘सावरकर’ या चित्रपटाचा उल्लेख करावाच लागेल. इथेही त्याने सावरकरांची भूमिका करण्यासाठी स्वतचे वजन कमी केले. त्यांच्या जवळ जाणारा लूक आणला. पण केवळ गेटअप करून, त्यांच्यासारखे दिसून भागत नाही, तर त्यासाठी संवादातून, डोळ्यांच्या, चेहऱयाच्या, हावभावातून सावरकर दिसायला हवेत. ते न दिसल्यामुळे एक चांगला व प्रयोगशील अभिनेता आणि वेगळा विषय असूनही लोकांपर्यंत तो पोहोचू शकत नाही. याचा विचार रणदीपने करायला हवा. त्याला असा एखादा चित्रपट मिळायला हवा की, त्यातून प्रेक्षकांच्या मनात असलेल्या, उत्तम शरीरयष्टी लाभलेला नायकाच्या रूपात रणदीप भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल अशी इच्छा बाळगू या.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)