
अभिनेत्री व भाजप खासदार कंगना रनौत हिने एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामान्य व्यक्ती नाही ते तर अवतार आहेत, असे विधान कंगनाने केले आहे.
कंगनाच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी खरपूस समाचार घेतला. ”समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी देव ‘अवतार’ घेत असतो अशी आपली साधी आणि भोळी भावना असते. पण खासदार कंगना रानौत यांनी घोषित केलेल्या ‘अवतारा’ने रुपयांची किंमत डॉलरच्या तुलनेत पार रसातळाला नेली, महागाई उच्चांकावर नेली, कधी नव्हे ते इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. असंख्य लाडक्या बहिणींनी पतीचा आधार गमावला. भारताच्या इतिहासात सामान्य माणसाचे पार ‘कल्याण’ करून टाकण्याची ‘किमया’ या अवताराने करून दाखवली”, असे रोहिणी खडसे यांनी ट्विट केले आहे.
एका सभेत बोलताना कंगना रनौत म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामान्य मनुष्य नाहीत, ते तर अवतार आहेत. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले तेव्हापासून राजकारण बदललं. 2014 च्या पूर्वी आपण तर मतदानही नाही करायचो. तरुणांना राजकीय नेत्यांबाबत राग निर्माण झाला होता. 2014 पूर्वी सगळे मिळून देश खात होते, पण आता अशी वेळ आली आहे की आपण स्वतः राजकारणात आलो आहोत. आता आपल्याकडे मोदींसारखा पंतप्रधान आहे, मोदी आल्यापासून देशाचा विकास सुरू झाला असेही रनौत म्हणाली.