कर्मचारी ठेव लिंक्ड विमा म्हणजेच ईडीएलआय योजनेचा कालावधी तीन वर्षांनी वाढवण्याचा निर्णय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने घेतला आहे. याचा ईपीएफओच्या जवळपास सहा कोटी सदस्यांना फायदा होणार आहे. ईडीएलआय योजनेअंतर्गत ईपीएफओ सदस्यांना तब्बल सात लाख रुपयांचा मोफत जीवन विमान मिळतो. यापूर्वी 28 एप्रिल 2021 रोजी ईडीएलआय योजनेसाठी अधिकृत अधिसूचना जारी करून ईपीएफओ सदस्यांच्या वारसांना मिळणारा विमा लाभ तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला होता. आता पुन्हा एकदा त्यात वाढ करण्यात आली आहे.
ईपीएफओने सात लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचे लाभ घेण्यासाठीचे नियमही शिथिल केले आहेत. या विम्याचा लाभ घेण्यासाठी आधी कर्मचाऱयाला एकाच ठिकाणी 12 महिने काम करणे आवश्यक होते, आता ही अट काढून टाकण्यात आली आहे. ईडीएलआय योजनेचा उद्देश ईपीएफओच्या सदस्यांना विम्याचा लाभ मिळवून देणे हा आहे. जेणेकरून जेव्हा एखाद्या ईपीएफओ सदस्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या कुटुंबाला अधिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही. दरम्यान, विम्याची रक्कम ईपीएफ खातेधारकाच्या नॉमिनीला दिली जाते.
– कर्मचाऱयांच्या पगारातून दरमहा जमा होणाऱया पीएफच्या रकमेपैकी 8.33 टक्के रक्कम ईपीएसमध्ये 3.67 टक्के ईपीएफमध्ये आणि 0.5 टक्के रक्कम ईडीएलआय योजनेत जमा केली जाते.
– ईडीएलआय योजनेअंतर्गत कोणत्याही खातेदाराला किमान अडीच लाख आणि कमाल सात लाखांचा विम्याचा क्लेम करता येतो. किमान क्लेम मिळविण्यासाठी खातेदाराने किमान 12 महिने सतत काम करणे गरजेचे आहे.
– जर कुणाला नॉमिनी केले गेले नसेल तर त्याच्या कायदेशीर वारसांना विम्याची रक्कम तितकीच मिळते. कर्मचाऱयाचा आजार, अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास विमा संरक्षण दिले जाऊ शकते.