सागरी सुरक्षिततेसाठी 11 महिन्यांची कंत्राटी पोलीस भरती

सागरी सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सुरक्षा मंडळातील जवानांची 11 महिन्यांकरिता कंत्राटी पोलीस भरती केली जाणार आहे. ही सर्व पदे तांत्रिक स्वरूपाची आहेत. कायमस्वरूपी तांत्रिक पदांची भरती होईपर्यंत तत्काळ मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी ही पदे भरली जाणार आहेत. त्याचबरोबर भारतीय तटरक्षक दलातून सेवानिवृत्त झालेल्या जवानांनाही अटी व शर्तीवर सेवेत सामावून घेतले जात आहे. या भरतीचा कोणत्याही अंमलदारांच्या पदोन्नतीवर परिणाम होणार नाही. दरम्यान, तांत्रिक माहिती असलेल्या पात्र कोळी तरुणांनाही सागरी सुरक्षा दलात प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यातील पोलीस दलात केल्या जाणाऱया पंत्राटी कर्मचारी भरतीमुळे सागरी सुरक्षेला धोका निर्माण होईल. तातडीने ही भरती प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी आमदार रमेश पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला केली. आमदार प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे, अॅड. अनिल परब यांनी चर्चेत भाग घेतला. गृह मंत्र्यांनी यावर उत्तर देताना राज्यात नियमित भरती प्रक्रिया राबवली जात आहे. उर्वरित रिक्त पदे लवकरच भरली जातील.

कोळी तरुणांनाही प्राधान्य देणार

तांत्रिक पदे भरण्याची प्रक्रिया सुरू

राज्य पोलीस दलात सागरी सुरक्षिततेसाठी असलेली पदे ही तांत्रिक स्वरूपाची आहेत. सरळसेवा कोटय़ातील एकूण 162 रिक्त पदांपैकी 50 टक्के म्हणजेच 81 रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सागरी सुरक्षेसाठी वेगवान बोटी चालवण्याकरिता पोलीस उपनिरीक्षक (सेपंड क्लास मास्टर) गट-ब (अराजपत्रित) आणि पोलीस उपनिरीक्षक (फर्स्ट क्लास इंजिन ड्रायव्हर) गट-ब (अराजपत्रित) ही तांत्रिक पदे महत्त्वाची आहेत. या पदांचे महत्त्व लक्षात घेऊन ती भरली जाईपर्यंत नौदल, तटरक्षक दलातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱयांची पंत्राटी भरती केली आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.