राहुरी तालुक्यातील कनगर येथे शेतीच्या वादातून एका मातंग समाजाच्या कुटुंबांवर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याने चार महिलांसह दोन पुरुष गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सोमवारी राञी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेची मिळताच राहुरी पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला होता. हल्ला करणाऱ्या तरुणाने कनगर गावात दहशत निर्माण केली आहे. गावातील अनेकांना मारहाण केली असल्याचे लाहुंडे कुटुंबाने पोलिसांना सांगितले आहे.पोलीस मात्र हल्लेखोर तरुणास पाठीशी घालीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मातंग समाज राहत असलेल्या वस्तीत जावून लाहुंडे कुटुंबातील महिलांशी झटापट करून त्या महिलांवर धारदार शस्त्राने वार केले आहेत. या घटनेत चार महिला गंभीररित्या जखमी झाल्या असून दोन पुरुष जखमी झाले आहेत. .यादरम्यान आरडाओरडा ऐकून गावातील लोक घटनास्थळी जमा होताच तेथून त्या टोळक्याने पळ काढला. या घटनेनंतर जखमींना तातडीने राहुरीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.
शेत जमिनीच्या वादातून या घटनेतील मुख्य आरोपीच्या विरोधात राहुरी पोलीसात ॲट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच गोष्टीचा राग धरून सोमवारी सायंकाळी मातंग समाजाच्या कुटुंबांवर हल्ला करण्यात आल्याची चर्चा उपस्थित नातेवाईकांमध्ये सुरू आहे. संगिता राधाकिसन लाहूंडे, पुष्पा बाळासाहेब लाहूंडे, अनिता विजय लाहूंडे, रेखा श्रीराम लाहूंडे, राधाकिसन नारायण लाहूंडे, बाळासाहेब नारायण लाहुंडे, अशी या प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत.
लाहुंडे कुटुंबावर हल्ला करणारे संपत ऊर्फ विकास हरीभाऊ गोसावी, गणपत हरीभाउ गोसावी, अशोक ऊर्फ ढवळ्या रघुनाथ माळी, रा. कणगर, तसेच गोविंद ऊर्फ गोयंद्या, सुदाम ऊर्फ सुद्या, व नादऱ्या, रा. बारागाव नांदुर, ता. राहुरी. या सहा जणांवर गुन्हा रजि. नं. 989 भारतीय न्याय संहिता कलम 189 (2), 191 (2), 191 (3), 190, 119 (1), 118 (1), 74, 76, 352, 351 (3), 351 (3), 79 तसेच अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 3 (1) (आर), 3 (1) (एस), 3 (1) (डब्लू), 3 (1) (डब्लू) (आय), 3 (1) (डब्लू) (आय, आय), 3 (2) (व्हिए) प्रमाणे मारहाण, प्राणघातक हल्ला व ॲट्रोसीटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.