
हिंदुस्थानी शेअर बाजार सलग सातव्या दिवशी उसळला. बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स पुन्हा एकदा 80 हजार पार गेला. सेन्सेक्स सहा महिन्यांनंतर 80 हजारपार गेला आहे. सेन्सेक्स दिवसअखेर 520 अंकांनी वधारून 80,116 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 161 अंकांनी वाढून दिवसअखेर 24,328 अंकांवर स्थिरावला.
सेन्सेक्सच्या 30 कंपन्यांच्या शेअर्सपैकी 24 शेअर्स फायद्यात, तर सहा शेअर्स तोटय़ात बंद झाले. एचसीएल टेकमधील शेअर्स सर्वात जास्त वाढले. सर्वात जास्त वाढ ही आयटी, फार्मा, ऑटोच्या शेअर्समध्ये दिसली. आज शेअर बाजार वाढल्याने गुंतवणूकदारांना जवळपास 3 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला. बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एपूण मार्केट कॅपिटलायझेशन 430.27 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.90 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.