
शिक्षणाच्या निमित्ताने अनाथ मुलींना घरी आणून त्यांच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) अल्पसंख्याक आघाडीच्या महाराष्ट्र उपाध्यक्षाला समर्थ पोलिसांनी 29 मार्चला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शंतनू कुकडे (वय- 53, रा. पद्माकर लेन) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
शंतनू काकडे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचा उपाध्यक्ष आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी दोन अनाथ मुलींना पुण्यात शिक्षणासाठी अजित पवार गटाचा पदाधिकारी आणले होते. तुमचे शिक्षण पूर्ण करण्याचा खर्च करतो, नोकरीला लावतो असे आश्वासन देऊन त्याने मुलींना स्वतःच्या फ्लॅटमध्ये ठेवले होते. दरम्यानच्या काळात त्याने एका मुलीवर बलात्कार केला. तिच्यासोबत असलेल्या एका दुसऱ्या मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी मुलीने २९ मार्चला समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित मुलीला संरक्षण द्यावे – शिवसेना
राष्ट्रवादीचा पदाधिकारी शंतनू कुकडे याने मुलींवर अत्याचार केला आहे. पीडित मुलीवर दबाव असतानाही तिने धाडस दाखवून तक्रार दाखल केली आहे. आरोपी शंतनूला तीन दिवसांपूर्वी अटक झाली आहे. आरोपी शंतनूला परदेशातून त्याच्या बँक खात्यावर रसद येते. गोरगरीब जनतेला आमिष दाखवून त्यांचे मतपरिवर्तन करत असतो, अशी आमची माहिती असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.
शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, राजेश मोरे, मुकुंद चव्हाण, राहुल जेकटे, अजय परदेशी, युवराज पारिख, राहुल आलम खाने, रमेश परदेशी, शैलेश जगताप, महिला आघाडीच्या रोहिणी कोल्हाळ, गौरी चव्हाण, निकिता मारटकर, पद्मा सोरटे, स्वाती कथलकर, स्मिता पवार यांनी समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्याकडे मागण्यांचे निवदेन सादर केले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी नाना पेठेत धडक दिली.