AI in Healthcare & Medical Field – वैद्यकीय क्षेत्र आणि एआयचा ‘डोस’

>> डॉ. बिपीन देशमाने

भविष्यात वैद्यकशास्त्रातील कोणतेही क्षेत्र कृत्रिम बुद्धिमत्तेपासून अस्पर्शित राहू शकत नाही. येणाऱ्या काळात वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रचंड मुसंडी मारलेली असेल यात शंका नाही. प्रत्येक टप्प्यावर डॉक्टरांच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ताही आपल्याला मदत करायला पुढे सरसावली आहे. इस्पितळाची पायरी चढायच्या आधीच आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता मदत करते.

वैद्यकीय क्षेत्रात केंद्रस्थानी रुग्ण असतो किंवा असला पाहिजे. त्याला बरे करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्र त्याच्याभोवती फिरत असते. इस्पितळातील कोणताथ विभाग रुग्णांशिवाय चालू शकत नाही.

हल्ली आयुष्यात कधीही दवाखान्यात किंवा इस्पितळात न गेलेला माणूस सापडणं फार दुर्मिळ आहे. कधी ना कधी प्रत्येकाला इस्पितळाची पायरी चढावीच लागते. इस्पितळात गेल्यानंतर केस पेपर काढणे, डॉक्टरने रुग्णाला तपासणे, गरज असेल तर काही चाचण्या करायला सांगणे, चाचण्यांचा रिपोर्ट बघून औषधे लिहून देणे किंवा आवश्यकता असेल तर इस्पितळात भरती करून घेणे, गरज असेल तर ऑपरेशन करणे आणि बरं झाल्यानंतर इस्पितळातून बाहेर सोडणे असा हा संपूर्ण घटनाक्रम असतो.

यातील प्रत्येक टप्प्यावर डॉक्टरांच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ताही आपल्याला मदत करायला पुढे सरसावली आहे. इस्पितळाची पायरी चढायच्या आधीच आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता मदत करते. हल्ली अनेक जण स्मार्ट घड्याळे वापरतात. त्यात हृदयाचे ठोके, रक्तदाब, किती चाललात, किती ऊर्जा खर्च केली इत्यादींची नोंद होते. यात फार अनियमितता आढळली तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन जीव वाचल्याची अनेक उदाहरणे आहेत. स्मार्टफोन वापरून स्वतः निदान करणारी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधने उपलब्ध आहेत. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगवर आधारित चॅटबॉटही उपलब्ध आहेत. त्यावर रुग्णांना डॉक्टरांशी संवाद साधता येतो.

रुग्णालयात आला केस पेपर से पेपर-लेस केस असा प्रवास सुरू झाला आहे. हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम नावाने ओळखल्या जाणाऱ्या एआय अधिष्ठित प्रणालीची अंमलबजावणी बरीच इस्पितळे करू लागली आहेत, मोबाईल अॅप आणि बेब पोर्टलद्वारे रुग्णालयांमध्ये अपॉइंटमेंट बुक करता येईल. रुग्णाला युनिक आयडेंटिटी क्रमांक मिळेल. रुग्णाच्या संपूर्ण आरोग्य इतिहासाची नोंद होईल. त्यामुळे एका क्लिकवर रुग्णाच्या रोगाची इत्यंभूत माहिती आणि ट्रेंड कळू शकतील. याला इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड असे म्हणतात. यामुळे रुग्ण तपासणीचा वेग वाढेल. या प्रणालीत साठलेल्या लाखो रुग्णांच्या प्रचंड माहितीचे विश्लेषण करून त्यांच्या प्रकृतीविषयी भविष्यातील अंदाज व्यक्त करता येतील. खेड्यापाड्यात, दुर्गम भागात वैद्यकीय सुविधा नसतात. अशा वेळी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अधिपत्याखाली टेलीमेडिसिन सेवा मिळू शकते. दूरस्थ पद्धतीने रुग्णाला तपासून वैद्यकीय सल्ला देता येतो.

रुग्णाला तपासल्यानंतर काही वेळा ठोस निष्कर्षाप्रत येण्यासाठी डॉक्टरांना रुग्णाच्या काही रोगनिदान चाचण्या करून घ्याव्या लागतात, या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेने मोठी आघाडी घेतली आहे. आवश्यकतेनुसार सिटीस्कॅन, एमआरआय, पेट स्कॅन, अल्ट्रासोनोग्राफी अशा चाचण्या केल्या जातात मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग शरीरातील अवयवांचे तपशीलवार चित्र तयार करते. ही चित्रे सामान्य आणि रोगग्रस्त ऊतींमधील, अवयवांमधील सूक्ष्म फरकदेखील दाखवतात. अशा प्रकारच्या चाचण्या केल्यानंतर फारच मोठा डेटा निर्माण होतो. या निर्माण झालेल्या डेटाचे आणि प्रतिमांचे पृथक्करण करून योग्य निष्कर्ष काढणे हे कसोटीचे काम असते. निष्णात डॉक्टर है काम करू शकतात. परंतु हेच काम सखोल शिक्षण अल्गोरिदमच्या साहाय्याने अधिक अचूक आणि वेगाने केले जाऊ शकते. डॉक्टरांना रोज शेकड्याने एमआरआय प्रतिमा पाहाव्या लागतात त्यांच्यावर कामाचा भार असतो. त्यामुळे लहानसहान गोष्टी काही वेळा लक्षात येत नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता दमत नाही. बकत नाही. दिवसाचे 24 तास काम करू शकते. स्त्रियांमधील स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाले तर रुग्णाला जीवनदान मिळू शकते. एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड वापरून स्तनाच्या कर्करोगाचे निदान करता येते. सखोल शिक्षण अल्गोरिदम वापरून अल्ट्रा सोनोग्राफीने मिळालेल्या प्रतिमा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने अगदी अचूकपणे तपासता येतात आणि पटकन निदान करता येते. पुढचे उपचार लगेच सुरू करून रुग्णाचा जीव वाचतो. इतर बन्याच रोगनिदान चाचण्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता अशीच भरघोस मदत करू शकते आणि डॉक्टरांच्या कामाचा भार व ताण हलका करते.

रुग्णाची तपासणी आणि रुग्णावर केलेल्या विविध चाचण्यांच्या आधारे डॉक्टर आवश्यक असेल तर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतात. येथेही कृत्रिम बुद्धिमत्ता डॉक्टरांच्या मदतीला येतेच. रोबोटच्या मदतीने केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा शस्त्रक्रिया अधिक अचूक होतात. डॉक्टरांची कार्यक्षमता त्यामुळे वाढते. अगदी ओपन हार्ट सर्जरीसारख्या अवघड शस्त्रक्रियेमध्ये रोबोटचा वापर होऊ लागला आहे. यांत्रिक हात, कॅमेरे, शस्त्रक्रियेसाठी लागणारी साधने, उपकरणे यांनी सुसज्ज असलेला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अधिपत्याखाली काम करणारा रोबोट डॉक्टरांच्या मदतीला सरसावला आहे. मानवी हाताची बोटे शरीरातील अडचणीच्या भागात जिथे पोहोचू शकत नाहीत तिथे रोबोटच्या हाताची बोटे पोहोचू शकतात, रोबोट सर्जनचे यांत्रिक हात आणि त्याची बोटे गरजेनुसार लहान-मोठी करता येतात. मानवी सर्जनच्या बाबतीत हे शक्य नाही. रोबोटमध्ये बसवलेल्या कॅमेऱ्यामुळे सर्जनला शस्त्रक्रियेच्या जागेचे त्रिमितीय चित्र दिसते. जे साध्या डोळ्यांनी दिसणे शक्य नाही. या अशा शस्त्रक्रियांमुळे शरीरावर सूक्ष्म आणि आवश्यक तेवढाच छेद घेतला जातो. पूर्वी मूत्रपिंडाच्या शस्त्रक्रिया करताना फार मोठी चीर घ्यावी लागत असे. आता आवश्यक तेवढाच छेद घेता गेलो. जास्त रक्तस्राव होत नाही. जखमा कमी होतात. रुग्नाचा त्रास वाचतो. गुंतागुंत कमी होते. शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता वाढते, शस्त्रक्रियेनंतर जखम भरून येण्याची प्रक्रिया जलद होते आणि रुग्ण लवकर बरा होतो.

डोळा अतिशय नाजूक, लहान आणि महत्त्वाचा अवयव आहे. डोळ्याची शस्त्रक्रिया जटिल आणि गुंतागुंतीची असते. ही मायक्रोसर्जरी असते. या ठिकाणी अतिशय बारीक चीर घ्यायची असेल तर ती तंतोतंत त्याच जागी घेणे आवश्यक असते. या अत्यंत कौशल्याच्या कामी कृत्रिम बुद्धिमत्ता निश्चितच उपयोगी ठरते. डोळ्यांच्या रोबोटिक सूक्ष्म शस्त्रक्रिया या रुग्णांसाठी वरदान ठरत आहेत.

पर्सनलाईज्ड मेडिसिनकडे….

जिनोमिक्स तंत्रज्ञानाद्वारे जन्मजात जनुकीय आजार जन्माआधीच ओळखून त्यावर उपचार करता येऊ शकतात, इथेही कृत्रिम बुद्धिमत्ता मोलाची कामगिरी बजावते. माणसाचा जिनोम हा तीन अब्ज म्युक्लिओटाइड एकमेकांना जौडून बनलेला असतो. जिनौमच्या अभ्यासामध्ये प्रचंड डेटा निर्माण होतो. हा डेटा वापरून जन्मजात जनुकीय आजार ओळखता येतात. भविष्यात होऊ शकणारे आजारही जाणून घेता येतात. या रुग्णाला कोणते औषध लागू पडेल हेही शोधता येते. जनरल मेडिसिनकडून आपला प्रवास पर्सनलाईज्ड मेडिसिनकडे सुरू झाला आहे. ही कृत्रिम बुद्धिमत्तेची कृपा आहे

(लेखक जैठतंत्रज्ञान राज्जा असून त्यांना औषधनिर्माण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे.)