विमानतळावरून गांजा आणि सोने जप्त

सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या दोन दिवसांत दोन कारवाया केल्या. 9.53 कोटींचा हायड्रो पॉनिक गांजा आणि 58 लाखांचे सोने जप्त केले आहे. या प्रकरणी एका प्रवाशाला सीमा शुल्क विभागाने अटक केली आहे.

विमानतळावर अमली पदार्थ तस्करीचे प्रकार होऊ नये म्हणून सीमा शुल्क विभागाने खबरदारी घेतली आहे. रविवारी सीमा शुल्क विभागाने सापळा रचला. एका खासगी विमानाने बँकॉक येथून एक प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची तपासणी केली. त्यात 9.532 किलो हायड्रो पॉनिक गांजा होता. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 9.53 कोटी रुपये इतकी आहे. त्याने तो गांजा ट्रॉली बॅगमध्ये लपवला होता. सीमा शुल्क विभागाने त्याचा जबाब नोंदवून त्याला अटक केली. तसेच दोन प्रवासी दुबई येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. त्या दोन प्रवाशांना सीमा शुल्क विभागाने थांबवले. त्याने अंतर्वस्त्रात सोने लपवले होते. जप्त केलेल्या सोन्याची किंमत 58. 83 लाख रुपये इतकी आहे.