
या जगात सर्वात उत्तम डॉक्टर भारतात आहेत. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे, एक डॉक्टर वाईट वागला म्हणून सर्वच डॉक्टर वाईट होत नाही. जगामध्ये भारताकडे अभिमानाने बघितलं जातं. देशातील एवढ्या मोठ्या घराण्याचं नाव ज्या रुग्णालयाला देण्यात आलं तिथे एवढी मोठी घटना घडते, हे अतिशय दुर्दैवी आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे.
सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, मंगेशकर कुटुंबियांचे योगदान हे केवळ देशात नव्हे तर जगभरात आहे. त्यामुळे जी भावना लोकांची आहे त्याची चर्चा झाली पाहिजे. एखादे रुग्णालय इतक्या असंवेदनशीलपणे कसं काय वागू शकतं? रुग्णालय प्रशासनाने कितीही माफी मागितली तरी त्यांचा गुन्हा कमीच आहे. पीडित महिला ही कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहीण, पत्नी मुलगी आहे. त्यामुळे समाजात आणि रुग्णालय प्रशासनात काही माणुसकी उरली आहे की नाही? असा संतप्त सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ज्या पद्धतीने पडीत महिलेला रुग्णालयाने वागणूक दिली, त्याचा करावा तितका निषेध थोडा आहे. त्यामुळे रुग्णालयावर कारवाई व्हायला पाहिजे. हॉस्पिटल सेवा दिली पाहिजे, आम्ही लोक प्रतिनिधी हे तुम्हा नागरिकांचे सेवक आहोत. भारताल लोकं खूप विश्वासाच्या नात्याने येतात, आणि आपल्याकडे डॉक्टरांना देव मानतात. आपण सगळ्यांनी कोरोना काळात अनुभवलं आहे. त्यामुळे एका हॉस्पिटलमुळे किंवा एका डॉक्टरमुळे सर्वच वाईट नसतात, पण या प्रकरणात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच जबाबादर आहे आणि त्यांना ही जबाबदारी घ्यावी लागेल. माझ्या माहितीप्रमाणे, ही जागा आदरणीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना आणि श्रीनिवास पाटील हे कलेक्टर असताना ही जागा देण्याबाबत प्रोसेस झाली. आणि लतादीदींच्या पुढाकाराने हे हॉस्पिटल उभारण्यात आलं. हा त्याचा इतिहास आहे. त्यानंतर नागरिक हॉस्पिटलमध्ये जात होते, त्याकाळातही अधूनमधून तक्रारी येत होत्या. शेवटी हॉस्पिटल असल्यामुळे सगळ्यांनी तेव्हा मदतीची भुमिका बजावली. पण दुर्दैव आहे की, एवढं मोठं नाव आहे त्या हॉस्पिटलला आणि त्याच्यात मंगेशकर कुटुंबाची काही चुक नाहीय, कारण ते त्या हॉस्पिटलच्या प्रशासनात नाहीय, फक्त ते ट्रस्टी आहेत. त्यामुळे आपण त्यांनाही विनंती करु की, दीनानाथ मंगेशकरांचं नाव दिलेल्या हॉस्पिटलमध्ये अशी घटना होतेय, हे अतिशय धक्कादायक आहे. मंगेशकर कुटुंबाचं या देशात एवढं मोठं योगदान आहे. मात्र दीनानाथ रुग्णालयाबाबत कुठलेही राजकारण न आणता या संबंधित प्रशासनावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून रुग्णालय प्रशासनाला फोन जातो आणि रुग्णालयाकडून त्यावर काहीही उत्तर मिळत नाही, हे धक्कादायक आहे. याबाबत दोन्ही बाजूंनी विचार केला पाहिजे. मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाची यंत्रणा आणि रुग्णालय प्रशासनने तर यावर हमखास बोललं पाहजे. राज्यात कायदा आणि माणुसकी उरली आहे की नाही? घडलेली घटना अतिशय जास्त दुर्दैवी आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सामान्य लोकांनी टॅक्स भरला नाही तर त्यांच्या घरापुढे तुम्ही बँड वाजवता मात्र या संस्थेने इतक्या कोटींचा कर थकवला असताना महापालिका प्रशासन कोणतीच ठोस का भूमिका घेत नाही. सामान्य लोकांसाठी एक न्याय आणि अशा या संस्थेला दुसरा न्याय का? लावता. असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. तसेच पुणे महानगरपालिकेने मंगेशकर हॉस्पिटल संदर्भात प्रॉपर्टी टॅक्स बाबत 48 तासात काही निर्णय केला नाही तर महानगरपालिका मध्ये मी आंदोलन करणार असल्याच सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.