रत्नागिरीतील शाळेतील आणखी एका लंपट शिक्षकाचा कारनामा उघड, विद्यार्थीनींना केले अश्लील मेसेज

विद्याथींनींशी अश्लील चाळे करणाऱ्या एका शिक्षकाचे बिंग फुटले असतानाच त्या शाळेत आणखी एका लंपट शिक्षकाचा कारनामा उघड झाला आहे. तू फार सुंदर आहेस, तू मला आवडतेस, शाळेच्या बाहेर मला भेट असा मेसेज एका शिक्षकाने विद्यार्थीनींना पाठवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या सर्व प्रकारामुळे पालकवर्गात संतापाचे वातावरण पसरले असून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तुला प्रॅक्टीकलला चांगले गुण हवे असतील तर मला खुश करावे लागेल असे सांगणाऱ्या शिक्षकाला पालकांनी चोप दिल्याची घटना काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. त्या शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली. हे प्रकरण ताजे असतानाच त्याच शाळेत आणखी एका शिक्षकाचा कारनामा उघडकीस आला आहे. या शिक्षकाने मुलींना तू फार सुंदर आहेस, तू मला आवडतेस, शाळेच्या बाहेर मला भेट असे मेसेज केले. या शिक्षकाच्या विरोधात तक्रार द्यायला तीन मुली पुढे आल्या आहेत.

गुरुशिष्याच्या पवित्र नात्याला कलंक लावण्याचे काम या दोन वासनांध शिक्षकांनी केले आहे. आपले बिंग फुटल्याचे लक्षात येताच त्या शिक्षकाने पळ काढल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणाची चौकशी करून आम्ही या शिक्षकांवर कारवाई करू असे आश्वासन शाळा व्यवस्थापनाने दिले आहे.