माझा आनंद.. आनंद.. हरपला! धर्मवीरांच्या पुतळ्यावरील हार, भगवी शाल ओरबाडून फेकणाऱ्या मिंध्यांनी माफी मागावी, शिवसेनेच्या संतप्त महिला पदाधिकाऱ्यांची मागणी

धर्मवीर आनंद दिघे यांना शिवसेना नेत्यांनी अर्पण केलेली शाल, पुष्पहार मिंधे गटाच्या गुंडांनी आणि काही महिलांनी ओरबाडून, खेचून रस्त्यावर फेकून दिला आणि पायदळी तुडवला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच ठाणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली. धर्मवीरांचा घोर अपमान करणाऱ्या मिंध्यांनी टेंभीनाक्यावरील पुतळ्याजवळ नाक घासून माफी मागावी, अशी मागणी मंगळवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीने केली आहे. आनंद दिघे यांच्यावर सिनेमा काढून स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या मिंध्यांच्या या कृत्याने माझा आनंद हरपला, अशी भावना व्यक्त होत आहे.

शिवसेनेच्या नेत्यांनी रविवारी ठाण्याच्या टेंभी नाक्यावरील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार व शाल अर्पण करून अभिवादन केले. यामुळे मिंधे गटाचा प्रचंड तिळपापड झाला. त्यांच्या हुल्लडबाजीला काडीचीही किंमत न देता शिवसेना नेत्यांनी धर्मवीरांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यामुळे मिंधे गटाचे बगलबच्चे बिथरले आणि त्यांनी थेट पुतळ्याकडे धाव घेऊन त्यांच्या गळ्यातील भगवी शाल आणि पुष्पहार ओरबाडून काढला.

मिंध्यांच्या हिना डिसोझा नावाच्या महिलेने चमकोगिरी करत हा हार आणि भगवी शाल थेट रस्त्यावर भिरकावून पायदळी तुडवली. फुकटची प्रसिद्धी मिळवताना आपण धर्मवीरांचा घोर अवमान करत आहोत याचे साधे भानही त्यांना राहिले नाही. त्याचा समाचार आज शिवसेनेच्या महिला आघाडीने पत्रकार परिषद घेऊन केला.

देवाला घातलेला हार पायदळी तुडवतात का?

देवाला घातलेल्या हाराचे निर्माल्य झाले तर त्याचेही पावित्र्य राखून विसर्जन करतात. देवाला घातलेला हार कुणी पायदळी तुडवतात का, तर पवित्र अपवित्र्याची व्याख्या यांना माहीत आहे का? धर्मवीर आनंद दिघे हे तमाम ठाणेकरांचे दैवत आहे. आनंद दिघे तुम्हाला किती समजले आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला आत्मियता आहे याचाही पर्दाफाश झाला. मिंध्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सिनेमात वाजवलेले ‘माझा आनंद हरपला’ हे गाणे खऱ्या अर्थाने त्यांनी सार्थ करून दाखवले, असा संताप महिला आघाडीच्या जिल्हा संघटक रेखा खोपकर यांनी केला. यावेळी महिला जिल्हा उपसंघटक आकांक्षा राणे, महेश्वरी तरे, संपदा पांचाळ, ज्योती कोळी, वैशाली शिंदे, वासंती राऊत, अनिता प्रभू आदी उपस्थित होते.