महाराष्ट्र बिहारच्या दिशेनं चालला आहे; मिंधे गटाच्या नाराज आमदाराची भाजपवर टीका

महायुतीतील 33 आमदारांना कॅबिनेट व 6 आमदारांनी रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. निकालाच्या 23 दिवसानंतर शपथविधी पार पडल्यानंतर आता महायुतीत नाराजी सत्र सुरू झाले आहे. अनेक मोठ्या नेत्यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात आल्याने ते नाराज असल्याचे समजते. दरम्यान मिंधे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनी थेट भाजप मिंधेंवर निशाणा साधत सध्या महाराष्ट्र बिहारच्या दिशेने चालला आहे, अशी टीका केली आहे.

”मंत्रीपद मिळालं नाही याचं दुख नाही, माझ्यासाठी मंत्रीपद महत्त्वाचं नाही, माझ्या मतदारसंघातील काम करणं महत्त्वाचं आहे. पण हे सर्व बघून दुख वाटतं की महाराष्ट्र चाललाय कुठे. राजकारणात विभागीय नेतृत्व दिली जायची. त्या विभागानुसार तिथून लोकांच्या कामासाठी उपयुक्त माणसांच्या हातात सत्ता देत आम्ही महाराष्ट्र एवढा पुढे नेला होता. पण आता विभागीय समतोल राखण्यापेक्षा, जातीय समतोल राखाला गेला आहे. त्यामुळे आपण कुठेतरी रिव्हर्स चाललोय. बिहारच्या दिशेने चाललो आहे असे मला वाटते, अशी टीका विजय शिवतारे यांनी केली.

दरम्यान आपल्याला ज्या प्रकारे वागणूक दिली त्याने आपण नाराज असल्याचे शिवतारे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. ”माझं नाव कट झाल्याचं दुख नाही. पण ज्या पद्धतीने सगळं व्हायला हवं होतं. लोकांना विश्वासात घेऊन काम करायला पाहिजे ते न झाल्याने नाराजी शंभर टक्के आहे. अडीच वर्षाने मंत्रीपद मिळालं तरी मी ते घेणार नाही. मंत्रीपदाबाबत माझा राग नाही पण वागणूक जशी दिली गेली त्याबाबत राग आहे, असे विजय शिवतारे म्हणाले.