
दुसऱ्या जातीच्या मुलासोबत पळून गेली म्हणून एका बापानेच आपल्या मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. बिहारमधील समस्तिपूरा येथे ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी मुकेश सिंग याला अटक केली आहे.
मुकेश सिंगची मुलगी साक्षी हिचे तिच्याच इथे राहणाऱ्या एका तरुणासोबत अफेयर होते. मात्र ते दोघे वेगवेगळ्या जातीचे असल्याने तिच्या घरच्यांचा त्यांच्या अफेयरल विरोध होता. त्यामुळे 5 एप्रिलला ती मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत दिल्लीला पळून गेली. त्यानंतर तिचे वडिल दिल्लीला गेले व तिला समजावून परत आणले. मात्र दोन दिवसांनी साक्षी अचानक गायब झाली. त्यामुळे तिच्या आईने मुकेशला तिच्याबाबत विचारले तेव्हा त्याने ती पुन्हा पळून गेली असे सांगितले. त्यानंतर जेव्हा तिच्या आईला त्यांच्या वागण्याचा संशय आला तिने पोलिसात धाव घेतली. पोलीस जेव्हा त्यांच्या घरी आले तेव्हा त्यांना घरात कुबट वास येत असल्याचे जाणवले. त्यांनी घरात शोधाशोध केली असता एका बंद बाथरूममध्ये साक्षीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तत्काळ मुकेश सिंगला अटक केली.