पावसाळा सुरू झाला तरी मान्सूनपूर्व कामे अपूर्ण असताना आता धावपळ करत महापालिका प्रत्येक वॉर्डमधून कचऱयाचे ढीग आणि राडारोडा गोळा करू लागली आहे. त्यासाठी दीड हजार कामगारांना कामाला लावले असून दिवसभरात या कामगारांनी 24 वॉर्डमधून 102 मेट्रिक टन कचरा आणि 132 मेट्रिक टन राडारोडा गोळा केला आहे.
मुंबईत सखोल स्वच्छता मोहिमेअंतर्गत 31 आठवडय़ांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. दर शनिवारी प्रत्येक विभागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. संपूर्ण 227 प्रभागांमध्ये ही मोहीम सुरू आहे. या अंतर्गत आज रस्ते, पदपथ, संरक्षण भिंती, वाहतूक बेट यांची योग्य प्रकारे स्वच्छता करण्यात आली. रस्ते आणि पदपथांची डागडुजी करून रंगरंगोटी करण्यात आली. लोंबकळणाऱया तारा, अनधिकृत जाहिरातींचे फलक हटवण्यात आले.
संततधार सुरू तरीही रस्ते पाण्याचे धुऊन काढले
मुंबईत पावसाने जोर धरला नसला तरी शुक्रवारी रात्रीपासून पावसाची संततधार आणि अधूनमधून तुरळक सरी सुरू आहेत. त्यामुळे मुंबईत गारवा निर्माण झाला असून आज रस्ते ओले होते. मात्र, तरीही आज राबवण्यात आलेल्या मोहिमेत पालिकेने 136 किमीचे रस्ते पाण्याने धुऊन काढले.
अपूर्ण नालेसफाई, कचऱयाच्या तक्रारी सुरूच
मान्सूनपूर्व कामांमध्ये अतिवृष्टीत मुंबईतील सखल परिसर पाण्याखाली जाऊ नये, रहिवाशांच्या जिवाला धोका पोहोचू नये यासाठी नालेसफाई केली जाते, मात्र ही नालेसफाई काही ठिकाणी योग्य प्रकारे झालेली नाही तर काही ठिकाणी झालेलीच नाही, असे चित्र मुंबईच्या वेगवेगळय़ा भागात आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी तक्रार दाखल केल्यावर, प्रत्यक्ष पालिका अधिकाऱयांना छायाचित्रे दाखवल्यावर घाटकोपर आणि वडाळय़ातील नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे, तर विक्रोळीतील नालेसफाई लवकरच सुरू करण्यात येणार आहे.