>> अंजुषा पाटील
कवयित्री माधुरी देव ताम्हाणे यांचा ‘काव्यक्त’ हा पहिलाच कवितासंग्रह असून या कवितासंग्रहात एकूण 51 कविता आहेत. निसर्गाचे विविध आविष्कार, सखा, सोबती, प्रियकर, स्वप्नं, नातेसंबंध, स्त्रीचं दु:ख, आनंद, जबाबदारी अशा अनेक विषयांवर या कविता व्यक्त होऊ पहातात.
“दु:ख” कवितेतून कवयित्रीने स्त्रियांचा संपूर्ण जीवनपट आपल्या डोळ्यासमोर उभा केला आहे. “ अश्रू ओघळू नाही दिलं , “सल रूतू नाही दिलं प्रेम “सुकू नाही दिलं प्रयत्न“सोडून नाही दिलं गुपित “कळू नाही दिलं “दिसू नाही दिल्या वेदना. आनंद “लपू नाही दिला , “परत पाठवून दिलं ” ते अलिप्त राहून. स्त्री जीवनाचा संपूर्ण आलेख फक्त आठ ओळींमधून रेखाटलेल्या या कवितेच्या अर्ध्या ओळी उमजलेला अर्थ लगेच लक्षात येत नाही.
“राऊळाच्या पायरीशी उन्ह टेकी माथा” देवळाच्या पायरीवर आलेलं उन्ह पाहून केलेली ही कविकल्पना मनाला भावते न भावते तोच पुढल्या ओळीत माधुरीताई लिहितात “वर्षावू दे, बरसू दे पाऊस हा आता” कमी शब्दात मोठा आशय सांगणा-या या अभंगात सर्व जगाचं हित साधणारं मागणं देवाकडे मागताना कवयित्रीने स्वत:साठी मात्र ”शब्दामधुनि जगो, जागो, नाव तुझे नाथा टाळ चिपळ्यांचा स्पर्श, घडो दोन्ही हाता” अशी प्रार्थना केली आहे.
‘पहारा’ या कवितेत कवयित्री म्हणते, ओसरीवर ठेवलेला मातीचं बुडकूल काठोकाठ भरून ओसंडला तरी पावसाला जवळ ठेवण्याचा अट्टाहास. जसं वय वाढते तसे बदल होतात आणि शेवटी माथ्यावरचा सूर्य तेवढा खरा हे तिला कळेपर्यंत पहाराच बरा असं वाटू लागते. हे पहारा कवितेमध्ये कवयित्रीने व्यक्त केल आहे. ‘गुपित’ या कवितेत आठवण कुणाची छळत असते, नुकते नुकते जेव्हा उजाडते पाकळी तुझी ओली असते तेव्हा निवांत रात्री आठवण कुणाची छळत असते ? असा प्रश्न कवयित्रीला पडतो.
अशा एकूण 51 कविता या ‘काव्यक्त’ काव्यसंग्रहात आहेत. निसर्गातली कोडी अलगद सोडवणारी ही अर्थपूर्ण कविता स्वत:ची अशी एक लय घेऊन अवतरते. समद्राची लाट, गोठय़ातील गाय, झाडाची सळसळ, पानगळ या सगळ्या घटना आपल्याही डोळयासमोर घडणा-या. पण कवयित्रीचं मन त्यातही काहीतरी शोधत राहतं. प्रश्नावर प्रश्न विचारत रहातं आणि अवचितपणे “मनात काहूर, शब्दांची चाहूल कवितेला मोहोर येणार काय?” हा प्रश्र्न समोर येतो तेंव्हाच एक सुंदर कविता वाचल्याचा आनंद मिळतो.
“कविता नव्हे – स्वप्नसंचित” या शीर्षकांतर्गत अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिताना ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे “दु:ख” या कवितेचं विश्लेषण करताना म्हणतात “संपूर्ण स्त्राr वर्गाचं संयत रूप, जगण्याची ही संथा घेऊन कसं निमूट जगत असतं हे वीस ािढयापदांचा हुकमी, लयबध्द वापर करून माधुरी ताम्हाणे यांनी मांडल्याचं लक्षात येतं. स्त्राr भावविश्वाचं हे संवादरूप खरं तर ‘मौनाचं दर्शन’ आहे. ”
आपल्या मनोगतात माधुरीताई लिहितात “निसर्ग, निसर्गाच्या विविध आविष्कारांचं आकर्षण आणि तितकंच कुतूहल . विज्ञानात मिळणाऱया उत्तरा पलिकडे जाऊन या प्रश्नांच्या मिळालेल्या कल्पनाधारित उत्तरांच्या नोंदींमधून कविता आकारत गेली. लहानपणी वडीलांकडून ऐकलेल्या गोविंदाग्रज, बालकवी ते अगदी वर्डस्वर्थ यांच्या मराठी, इंग्लीश कवितांमुळे माझ्यावर कवितेचे संस्कार झाले” चित्रकार दत्तात्रय पाडेकर यांचं सुंदर मुखपृष्ठ असून, कवितेत निसर्ग प्रेम, आई-वडिलांचं वात्सल्य, मौन, प्रेमाच्या छटा आणि वेगवेगळ्या भावनांचा अविष्कार यांनी सजलेला हा कवितासंग्रह असून कविता वाचल्यावर वाचकांना त्याचा अर्थ नक्की कळेल, उमजेल .
काव्यक्त लेखक : माधुरी देव-ताम्हाणे
पृष्ठे : 92 मूल्य : रु. 130/-
प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन