परीक्षण – आशयानुगामी आविष्कार

>> साबीर सोलापुरी

नांदेड जिह्यातील मारोती मानेमोड हे उमलत्या ऊर्मीचे, उत्तुंग प्रतिभेचे दमदार गझलकार आहेत. ‘निर्गुणी आकार’ हा त्यांचा पहिला गझलसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या गझलकाराने या झपाटलेपणाने गझलेचा हात धरला आहे. तो हात त्यांना आशयसंपन्नतेच्या शिखरावर घेऊन जातो. त्यांच्या संग्रहातील कोणत्याही गझलेतील एखादा शेर बाजूला काढून वाचला, अभ्यासला तर त्यातील आशयघनता सहजगत्या लक्षात येते. ही सखोल आशयघनताच वाचकांना मोहिनी घालते. त्यांच्या गझलेगणिक वाचक प्रभावित होत जातो याचे मुख्य कारण म्हणजे त्यातील आशयघनता हेच आहे. प्रत्येक शेर हा त्यांच्या जाणिवेतून-नेणिवेतून आविष्कृत होतो. गझलेत काफिये-रदीफची तंत्रशुद्ध जुळवाजुळव अपरिहार्य असते, परंतु प्रतिभेबरोबरच ज्यांची तंत्रावर मूलभूत हुकमत असते त्यांच्यासाठी अशा प्रकारची जुळवाजुळव कधीच क्लिष्ट आणि डोकेदुखी ठरत नाही. उलटपक्षी तो अधिकार नवनव्या प्रयोगशीलतेने प्रकट होत असतो. मानेमोड हे त्या कोटीतील सिद्धहस्त गझलकार आहेत.

मानेमोड यांच्या गझलेत विषयांचे विपुल वैविध्य, मांडणीतील निखळ दृष्टिकोन अचंबित करणारा आहे. सोबत तळाशी असणारी आशयघनता हा त्यांच्या गझलेचा स्वभाव, प्रभाव, स्थायिभाव असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. कोणत्याही उत्कृष्ट रचनेची ही खासीयतच असते की, अभिव्यक्तीच्या स्तरावर आपल्याला नेमके काय सांगायचे आहे, या विचारावर हा गझलकार सुरुवातीपासूनच स्पष्ट असल्याकारणाने तो दुर्बोध शब्दांच्या आश्रयाला जात नाही. साध्यासुध्या प्रवाही शब्दांतून खूप काही अंत:करणाला भिडणारे सांगता येऊ शकते हे या गझलकाराने साबीत केले आहे.

गझलेने हे जग सुंदर बनवले आहे. किमानपक्षी त्यातली कुरूपता तरी नक्कीच कमी केली आहे. गझलेने नेहमीच द्वेषाला तिलांजली देऊन निखळ माणुसकीचा उद्घोष केला आहे. सद्भाव आणि माणुसकी हे गझलेचे अलंकार आहेत. जगातल्या प्रत्येक माणसाला आपण सुंदर दिसावे असेच वाटत असते. गझलेत ही सुंदरता सामावलेली असते. सुंदर असणे ही भावनासुद्धा सुंदरतेचे निदर्शक आहे. याला गझल अपवाद नाही.
गझलेमधुनी घडतो नक्कीच सदैव माणूस सुंदर
फुटून येतो द्वेषालाही माणुसकीचा पाझर

नदीचे स्वच्छंद वाहणे सर्वांनाच दिसत असते. तिची घुंगरासारखी खळखळ स्पष्टपणे ऐकू येते. मात्र तिच्या आतले काहूर कोणीच ऐकत नाही. या दाटलेल्या काहुराची नदी कधीच वाच्यता करत नाही. काठावरच्या माणसाला नदी व्याकूळ करत नाही.
दिल्या व्याकूळ जेव्हा मी नदीला सारख्या हाका
तिची खळखळ मला देते तिचा काहूर अर्ध्यावर

विजयोत्सव साजरा करण्यासाठी गुलाल उधळण्यात येतो. त्यात जिंकल्याची झिंग असते. मात्र नंतर हाच गुलाल पायदळी तुडवला जातो, तो क्षणभंगूर ठरतो याचे विजेत्यालाही सोयरसुतक नसते. माणसाच्या जिंदगीची कथाही याहून वेगळी नसते. गुलालाबरोबरच माणसाच्या जिंदगीतील खिन्नताही या शेरातून प्रत्ययकारी शब्दांतून प्रकट होत जाते.
ही गुलालाच्या कथेची जिंदगी
सारखी चोहीकडे उधळव पुन्हा

गझलकाराचे मन गर्दी असते. तो कधीच एकटा नसतो. तो जरी बाहेरून एकटा वाटत असला तरी तो आतल्या गर्दीत मिसळलेला असतो. ही आत उसळलेली गर्दीच त्याला बाहेर पडू देत नाही. आतल्या आत त्याची समाधी लागलेली असते. मनातली गर्दी त्याला सारखी बेचैन करत असते. या गर्दीतल्या सुखदुःखाला शेरात ओवून तो गझल रसिकांसमोर ठेवतो.
स्वतच्या आतल्या गर्दीत मी
कुठे बाहेर बोलावता मला

आईमुळेच तर घराला घरपण लाभते, आईच्या अस्तित्वाने घराला राऊळाचे स्वरूप प्राप्त होते हे खरे असले तरी घराची कळा अंगण सांगते असे म्हणतात हेही नाकारता येत नाही. ज्या घरात पोरगी असते, त्या घराची शोभा उठून दिसते. आई घरपण जपते तर पोरगी अंगणाची शोभा वाढवते. दोघींच्या असण्याने घर अंगण शोभिवंत होऊन जाते.
एकाच शेरात मानेमोड यांनी आई आणि पोरगी… दोघींचेही अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले आहे.
माय आणते घरास घरपण
अंगणातला सडा पोरगी

विविध विषयाबरोबर आध्यात्मिक डूब असलेले अनेक शेर मानेमोड यांनी लिहिलेले आहेत. तुळजापूरसारख्या तालुक्याच्या ठिकाणाहून ‘निर्गुणी आकार’ हा दर्जेदार आणि देखणा गझलसंग्रह काढण्यात आला आहे हे विशेष उल्लेखनीय आहे.

निर्गुणी आकार: गझलसंग्रह
गझलकार : मारोती मानेमोड
प्रकाशक : समग्र प्रकाशन, तुळजापूर
पृष्ठे: 121 मूल्य: रु.230