नीलकमल दुर्घटना प्रकरण – सात वर्षीय जोहान पठाणचा मृतदेह सापडला

नीलकमल या प्रवासी बोटीला अपघात झाल्यापासून जोहान पठाण हा 7 वर्षांचा मुलगा बेपत्ता होता. घटना घडून 4 दिवस लोटले तरी त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. अखेर शनिवारी दुपारी जोहान याचा मृतदेह सापडला. नीलकमल बोटीच्या खाली जोहानचा मृतदेह अडकला होता. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर तो कुटुंबीयांकडे सोपवण्यात येईल, अशी माहिती मिळतेय.

बुधवारी दुपारी ‘गेट वे ऑफ इंडिया’हून एलिफंटासाठी निघालेल्या नीलकमल या प्रवासी बोटीला उरण येथील समुद्रात अपघात झाला होता. नौदलाची स्पीड बोट धडकल्याने ही दुर्घटना घडली होती. या भीषण अपघातात आतापर्यंत 14 जणांना मृत्यू झाला असून जोहान पठाण या सात वर्षांच्या मुलाचा अद्याप थांगपत्ता लागलेला नव्हता. जोहान आणि हंसराज भाटी (वय- 43) हे दोघे घटना घडल्यापासून बेपत्ता होते. गुरुवारी अपघातग्रस्त बोटीच्या खालच्या बाजूला अडकलेल्या हंसराज यांचा मृतदेह सापडला. मात्र सात वर्षांचा जोहान अजून सापडू शकला नव्हता.

अडीचची डेडलाईन असताना ‘नीलकमल’ सवातीनला सुटलीच कशी? वाढीव प्रवासी कोंबण्यासाठी प्रवाशांच्या जीवाशी खेळ

बोट किनाऱ्याला आणली, पण तपासणीच नाही

नीलकमल बोट गुरुवारी संध्याकाळी शिवडीच्या लकडा बंदर येथे टोव्ह करून आणण्यात आली. पण तिची तपासणी करण्याची जबाबदारी कोणी घेत नसल्याचे चित्र आहे. याच बोटीखाली हंसराज भाटी यांचा मृतदेह सापडला होता. अजून कोणी बोटीखाली अडकून पडले आहे का याचा शोध होणे गरजेचे होते. परंतु यासाठी सक्षम यंत्रणा पुढाकार घेत नसल्याने त्या बोटीचे संपूर्ण निरीक्षण चार दिवस झाले तरी झाले नव्हते. मात्र शनिवारी निरीक्षण करण्यात आले आणि बोटीखालीच जोहान पठाण याचा मृतदेह सापडला.