दोन दलित मुली मृतावस्थेत आढळल्या; दोन तरुणांवर FIR दाखल

 

उत्तर प्रदेशातील फारुखाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे दोन 15 आणि 18 वर्षांच्या दलित मुली झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडल्या. या प्रकरणी मुलींच्या वडिलांनी 2 मुलांविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही मुलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा (कलम 108) गुन्हा दाखल केला आहे. दीपक आणि पवन असे या दोन मुलांची नावे आहेत. मात्र सध्या ही दोन्ही मुले गावातून फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांचा अन्य तपास सुरु आहे.

26 ऑगस्ट रोजी फरुखाबादच्या भगवतीपूर गावात गावातील दोन मुली जन्माष्टमीचा उत्सव पाहण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. मात्र बराच वेळ झाला तरी त्या घरी परतल्या नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्य़ांचा मृतदेह आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत गावकऱ्यांना सापडले होते. त्यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केली. यावेळी चौकशी दरम्यान मृत मुलींच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत.

दरम्यान दोन्ही मुलींच्या घरच्यांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली. यावेळी एका मुलीच्या वडिलांनी गावातील दोन मुलां त्यांच्या मुलींच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवले आहे. वडिलांच्या तक्रारीनुसार, मुली फरुखाबादच्या कांपिल पोलीस स्टेशन परिसरात राहणारा दीपक आणि कायमगंजच्या भगवतीपूर गावात राहणारा पवन यांच्याशी खूप दिवसांपासून बोलत होत्या. या मुलांनी अनेकदा त्यांना त्रास दिला असून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक खुलासा देखील केला आहे.

अल्पवयीन मुलींच्या मृतू प्रकरणी पोलिसांनी या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळाची पहाणी करत असताना मुलींच्या मृतदेहाजवळ मोबाईल फोन आढळून आला आहे. तसेच पोलिसांनी मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दरम्यान सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.