तीन हजार गुंतवणूकदारांची 100 कोटींच्या फसवणुकीची तक्रार, टोरेस नंतर आता ‘मनी एज’चा घोटाळा उघड

टोरेस आर्थिक फसवणूक हे सध्या हॉट प्रकरण असतानाच आता नवीन आर्थिक फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. हजारो गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱया मनीएज ग्रुप ऑफ कंपनीजच्या चार संचालकांसह अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सुमारे तीन हजार गुंतवणूकदारांची 100 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

मनीएज ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक आणि भागीदारांनी गुंतवणूक केल्यास पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या माध्यमातून 24 टक्क्यांनी वार्षिक परतावा मिळेल असे आमिष नागरिकांना दाखवले होते. त्याला बळी पडत राहुल पोद्दार व त्यांच्या ओळखीच्या लोकांनी मिळून दोन कोटी 80 लाख 80 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. जानेवारी 2022 ते मे 2024 या दरम्यान ही गुंतवणूक झाली. ठरल्याप्रमाणे काही महिने दोन टक्क्यांनी महिन्याला परतावा देण्यात आला, मात्र ऑक्टोबर 2024 पासून कंपनीकडून परतावा मिळणे बंद झाले. त्यामुळे राहुल पोद्दार व अन्य गुंतवणूकदारांनी याबाबत आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी कंपनीचे संचालक राजीव जाधव, हरिप्रसाद वेणुगोपाल, प्रणव रावराणे, प्रिया प्रभू यांची चौकशी केली, मात्र या चौघांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा आणखी तपास केला असता त्यात बऱयाच बाबी समोर आल्या. त्यामुळे मंगळवारी मुलुंड पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून कंपनीचे संचालक राजीव जाधव, हरिप्रसाद वेणुगोपाल, प्रणव रावराणे, प्रिया प्रभू आणि अन्य जबाबदार व्यक्तींविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

बेकायदेशीर गुंतवणूक, गैरवापर

मनीएज ग्रुपने गुंतवणूकदारांकडून बेकायदेशीरपणे गुंतवणूक करून घेतली. शिवाय त्या निधीचा गैरवापर केला तसेच सेबीच्या नियमांचा भंग केल्याचे तपासात आढळून आले.

तीन हजार गुंतवणूकदार, 100 कोटींची आर्थिक फसवणूक

  • मनीएज ऑफ कंपनीजने दाखवलेल्या आमिषाला बळी पडत राहुल पोद्दारप्रमाणे तीन हजार गुंतवणूकदारांनी मिळून 100 कोटी रुपयांची कंपनीच्या विविध प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केल्याचे समोर येत आहे.
  • मनीएज ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये मनीएज इन्व्हेस्टमेंट, मनीएज फायनकॉर्प, मनीएज रिअल्टर्स, मनीएज कॅपिटल सर्व्हिसेस यांचा समावेश होता. या कंपन्या मुद्रा व्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि जीवन मल्टिस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या सहाय्याने तयार करण्यात आल्या होत्या, असे तक्रारीत नमूद असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.
  • रावराणे हा मॅकेनिकल इंजिनीयर असून हरिप्रसाद आणि राहुल हे दोघे खासगी कंपनीत कामाला होते. तर प्रिया प्रभू ही पोस्ट विभागात कामाला होती. तिने तेथून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर एकमेकांच्या संपर्कात आलेल्या या चौघांनी वर्ष 2013 मध्ये मनीएज ग्रुप ऑफ कंपनीच्या अंतर्गत विविध चार कंपन्या स्थापना केल्या होत्या, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते. पोलीस अधिक तपास करत आहेत.