जालना जिल्हा पोलीस दलातर्फे काल 1 जून रोजी रात्री ऑल आऊट ऑपरेशनदरम्यान नाकाबंदी करून, गुन्हेगारविरुद्ध ठिकठिकाणी कोंबिंग ऑपरेशन करून कारवाई करण्यात आली आहे._
या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान जालन्यातील रामनगर (साखर कारखाना) येथे नाकाबंदी करून, मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धडाकेबाज कारवाई करीत, जालन्याकडून मंठ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका संशयित पीकअप वाहनास पाठलाग करून पकडले. यावेळी या वाहनांची झाडाझडती घेतली असता, हे वाहन रॉयल स्टॅग, इम्पेरिएल ब्लू, रॉयल चॅलेंज, यासह विविध कंपन्याच्या विदेशी दारूच्या साठ्याने खचाखच भरलेले होते.
तब्बल 100 बॉक्स विदेशी दारूचा हा साठा असून, त्याची किंमत 8 लाख 53 हजार रुपये आहे. दारूसाठा आणि 10 लाखाचे वाहन, असा एकूण 18 लाख 53 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी वाहनात असलेल्या राजू साहेबराव भालेराव (रा. नूतनवसाहत, जालना) आणि लखन अशोक अंभोरे (रा.लक्ष्मीनगर, मंठा चौफुली, जालना) या दोघांना ताब्यात घेत, अटक केली आहे. मौजपुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(a)(e), 80 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यातील अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना जालना येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, परतुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस हवालदार राऊत, बर्डे, नितीन खरात, कुटे, राजेंद्र देशमुख, अविनाश मांटे, प्रदीप पाचरणे, प्रशांत मस्के, कैलास शिवणकर आदींनी ही कामगिरी केली आहे.