चिनी विषाणूने अंबानी आणि अदानींचे 52 हजार कोटी खाल्ले, शेअर बाजार गडगडल्यामुळे प्रचंड नुकसान

ह्युमन मेटान्यूमोव्हायरस या चिनी विषाणूने महाराष्ट्रातही शिरकाव केला असून दोन दिवसांपासून शेअर बाजारात अक्षरशः भूपंप आला आहे. गुंतवणूकदारांचे कोटय़वधी रुपये बुडाले असून या विषाणूने मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या जगातील अव्वल 20 श्रीमंतांमध्ये गणना होणाऱया अब्जाधीशांनाही सोडले नाही. या विषाणूने अंबानी आणि अदानींचे तब्बल 52 हजार कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकातून ही बाब समोर आली आहे.

मेटान्यूमोव्हायरस या विषाणूचा हिंदुस्थानात शिरकाव झाल्यापासून गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजार कोसळतो आहे. आज शेअर बाजारातील घसरणीमुळे अंबानी आणि अदानींच्या संपत्तीत तब्बल 52 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. मुकेश अंबानींच्या संपत्तीत 2.59 अब्ज डॉलर्स म्हणजेच 22 हजार कोटीरुपयांहून अधिकची घट झाली. त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती 90.5 अब्ज डॉलर्सपर्यंत घसरली. 2025 च्या पहिल्या सहा दिवसांत अंबानींच्या संपत्तीत 119 मिलियन डॉलर्सची घट झाली आहे. सध्या मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत 17 व्या क्रमांकावर आहेत.

अदानींना 30 हजार कोटींचा फटका

आशियातील दुसऱया क्रमांकाचे आणि जगातील 19 व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत सर्वाधिक घट झाली आहे. ‘ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स’’ने दिलेल्या माहितीनुसार अदानींच्या संपत्तीत 3.53 अब्ज डॉलर्स, म्हणजेच 30 हजार कोटी रुपयांहून अधिकची घट झाली आहे. या घसरणीसह त्यांची एकूण संपत्ती 74.5 अब्ज डॉलरपर्यंत खाली घसरली. विशेष बाब म्हणजे 2025 च्या पहिल्या काही दिवसांतच त्यांच्या संपत्तीत 4.21 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.