चासनळीत साकारतेय देशातील पहिली ‘श्रीरामसृष्टी, पहिल्या देखाव्याचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत लोकार्पण

दक्षिणगंगा गोदावरी किनारी प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या, तसेच वाल्मीकी रामायणात उल्लेख असलेल्या चासनळीतील ‘श्रीरामसृष्टी ‘त १५ फूट उंचवट्यावर २१ फुटी प्रभू रामचंद्रांचे धनुर्धारी शिल्प व सुवर्णमृग (मारीच) शिल्प यांची उभारणी करण्यात आली आहे. देशातील पहिली ‘श्रीरामसृष्टी’ येथे साकारण्यात येत आहे

त्याच्या पहिल्या देखाव्याचे उज्जैन येथील राष्ट्रीय संत बालयोगी श्रीक्षेत्र वाल्मीकी धाम पीठाधीश्वर अवंतिकापुरी खासदार स्वामी उमेशनाथ महाराज, तालुक्यातील मंजूर येथील श्री श्री श्री १००८ महाराष्ट्र पीठाधीश्वर महामंडलेश्वर स्वामी शिवानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले

सवाद्य मिरवणुकीने शेकडो महिला, नागरिक, युवक, युवती… त्यांनी केलेला आकर्षक पेहराव… फेटे… भगव्या टोप्या….. लेजीम खेळत… बालकांनी साकारलेले राम-लक्ष्मण, सीता, हनुमान यांचा देखावा आणि खासदार उमेशनाथ महाराज व महंत शिवानंदगिरी महाराज यांची सजविलेल्या बग्गीतून चासनळी गावातून मिरवणूक काढण्यात आली. प्रभू श्रीरामांचा जयजयकार करीत उभारलेल्या धनुर्धारी प्रभू श्री रामचंद्र व सुवर्णमृग मारीच हरिण यांच्या शिल्पांना क्रेनमधून खासदार महामंडलेश्वर महंत उमेशनाथ महाराज व मंजूर येथील शिवानंद गिरी महाराज यांनी पुष्पहार अर्पण केले. तसेच अभिषेक आणि पूजा विधी करण्यात आला.

यावेळी उपस्थित शेकडो भाविकांनी दक्षिणगंगा गोदावरी मातेची आरती केली. याप्रसंगी गोदापात्राशेजारी असलेल्या वीस एकर जागेत १०१ जोडप्यांच्या हस्ते यज्ञ करण्यात आला. याप्रसंगी बोलताना खासदार उमेशनाथ महाराज यांनी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून या श्रीराम सृष्टीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. शिवानंद गिरी महाराज यांचेही यावेळी आशीर्वचनपर भाषण झाले.

निफाड व कोपरगाव तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या चासनळी येथील दक्षिणगंगा गोदावरी तीराजवळ वीस एकरांमध्ये देशातील पहिले आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणार असल्याचा दावा करण्यात आला असून, येत्या चार वर्षांत हे पर्यटनस्थळ विकसित होणार आहे. महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील ही पहिली श्रीरामसृष्टी उभारण्याचा मानस चासनळी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी हाती घेतला आहे. चासनळी परिसरातील ग्रामस्थांनी पहिल्या टप्प्यासाठी ३५ लाख रुपये सढळ हाताने श्रीरामसृष्टी उभारण्यास हातभार लावला आहे

अशी आहे श्रीरामसृष्टी… 

रामायणातील सर्व प्रसंग शिल्प व म्युरल प्लेट स्वरूपात २० एकरांमध्ये उभारण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने सत्ययुगद्वार, कलियुगद्वार, द्वापारयुगद्वार व वैकुंठद्वार अशी चार प्रवेशद्वारे उभारण्यात येणार आहेत. गोदातीरावर शरयू घाट, यमुना घाट, गंगा घाट व कावेरी घाट असे ५०० फुटांचे चार घाट उभारण्यात येणार आहेत. मध्यभागी १५१ फूट उंचीचा धर्मध्वज असून, ११११ किलोंची घंटा जिचा निनाद पाच किलोमीटरपर्यंत ऐकू येईल. आजतागायत हिंदुस्थानला अखंडित ठेवण्यासाठी लढलेले सर्व सम्राट यांची माहिती व दोन ध्यानधारणा केंद्रे, पर्यटकांसाठी राहण्याची व्यवस्था, अत्याधुनिक ग्रंथालय, वाचनालय, तसेच गोदावरी नदीप्रवाहामध्ये शंकर व पार्वती यांची ५१ फुटांची शिल्पे उभारण्यात येणार आहेत. प्रभू श्रीराम यांच्या जन्मापासून ते शरयू नदीत जलसमाधी घेण्यापर्यंत सर्व घटनाप्रसंगांची एकूण ४२ शिल्पे उभारली जाणार आहेत. या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, त्यात प्रभू रामचंद्र व सुवर्णमृग मारीच यांची शिल्पे उभारण्यात आली आहेत. ही ‘श्रीरामसृष्टी’ पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ होणार

प्रभू श्रीरामांचे व सुवर्णमृग मारीच यांचे नजरेत भरणारे आकर्षक शिल्प अहिल्यानगर येथील निंबाळकर यांचे हस्तगिरी आर्ट यांच्या वतीने फायबर कोटेड पद्धतीने साकारण्यात आले आहेत. चासनळी गावाजवळून शिर्डी-सुरत महामार्ग जात असल्याने या ‘श्रीरामसृष्टी’ला मोठे महत्त्व येणार असून, आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून त्याचा विकास होणार असल्याचा विश्वास चासनळीचे ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

रामायण व महाभारतकालीन ऐतिहासिक, धार्मिक आणि पौराणिक दाखले कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहेत. पूर्वी दक्षिणगंगा गोदावरी किनारी दंडकारण्याचा भाग होता. राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून श्रीराम सृष्टीचा एक भाग असलेली रामेश्वर मंदिरासाठी दहा लाख रुपये, गुंठाई माता मंदिरासाठी दहा लाख व आता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून २ कोटी ५० लाख रुपये पायाभूत सुविधांसाठी मंजूर करण्यात आले आहेत. भाविकांनी नियोजित श्रीराम सृष्टी बघण्यासाठी या स्थळाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सचिन चांदगुडे, ग्रामस्थ